एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा या पक्षातून निवडणूक लढवण्याची शक्यता
प्रदीप शर्मा राजकारणात येणार ?
मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला तीन कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये मुंबईतून अटक करणारे तसेच ११३ गुंडांचा खात्मा करणारे चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देत स्वेच्छा निवृत्ती स्विकारली आहे. प्रदीप शर्मा हे शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. त्यांचा राजीनामा पोलीस महासंचालक कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत असून तो मंजूर झाल्यानंतर ते विधानसभा निवडणुकीसाठी अंधेरी किंवा नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
प्रदीप शर्मा हे ठाणे क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत होते. प्रदीप शर्मा हे १९८३ मध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत झाले होते. त्यांच्या बॅचमध्ये आणखी २ एनकाउंटर स्पेशालिस्ट होते. ते म्हणजे शहीद विजय साळसकर आणि प्रफुल्ल भोसले.
प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले आणि शहीद विजय साळसकर हे तिन्ही महाराष्ट्र पोलीसचे १९८३ च्या बॅचचे अधिकारी आहेत. गुंड्यांचा खात्मा करणारे अशी त्यांची देशभरात ओळख आहे. १९८३ च्या बॅचची ओळख ही 'किलर बॅच' म्हणून देखील आहे. या बॅचच्या अधिकाऱ्यांनी दाऊद इब्राहिम, छोटा राजन आणि इतर गुंड गँगच्या ३०० हून अधिक गुंडांचा खात्मा केला आहे.
१९९० मध्ये मुंबई क्राईम ब्रांचमध्ये अंडरवर्ल्डच्या गुंडांना संपवण्यासाठी या पोलिसांना सूट देण्यात आली होती. ज्यामध्ये या शूर अधिकाऱ्यांनी ३०० हून अधिक गुंडांना संपवलं आणि मुंबई गुंडमुक्त केली होती.
२००८ मध्ये प्रदीप शर्मा यांना सस्पेंड करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आरोप होता की, लखन भैया गँगस्टरचं फेक एन्काऊंटर त्यांनी केलं होतं. ज्यामध्ये इतर १३ अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली होती. पण २०१३ मध्ये त्यांनी निर्दोष सूटका झाली. २०१७ मध्ये प्रदीप शर्मा पुन्हा चर्चेत आले जेव्हा त्यांनी दाऊदच्या भाऊ इकबाल कासकरला अटक केली.