कोण अर्धवटराव तर कोण बॉबी डार्लिंग? राजकीय वादात सिनेमातल्या पात्रांची एन्ट्री
महाराष्ट्रातल्या राजकारणातील वाद आता आणखी किती खालची पातळी गाठणार?
Maharashtra Politics : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्यातील उत्तरसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. शरद पवार हे जातीपातचं राजकारण करतात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीचं राजकारण सुरु झाल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला होता.
राज ठाकरे यांच्या आरोपांना स्वत: शरद पवार यांनी उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
धनंजय मुंडे यांनी उडवली खिल्ली
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख अर्धवटराव असा केलाय. पूर्वी रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरु आहे. अर्धवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले, अशा शब्दात मुंडे यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
मनसेचा पलटवार
धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंवर भाजपचे अर्धवटराव अशी टीका केली आणि मनसेच्या नेत्यांच्या संतापाचा स्फोट झाला. मनसे नेत्यांनी सोशल मीडियावरून मुंडेंच्या खासगी भानगडी चव्हाट्यावर आणल्या. मनसे नेते अमेय खोपकर यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं.
अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची 'अर्धवटराव' म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या 'तात्या विंचू' चा ओम फट स्वाहा करणार आहेत. राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे. लवकरच तुमचा थरथराट होणार... असा इशारा देणारं ट्विट अमेय खोपकरांनी केलं...
खोपकरांनी धनंजय मुंडेंना तात्या विंचू म्हटलं... तर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसची बॉबी डार्लिंग आहेत, अशी खिल्ली योगेश चिलेंनी उडवली. धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची "बॉबी डार्लिंग" आहे... आयुष्यात इतक डार्लिंग डार्लिंग केलंय की तिच डार्लिंग आता अंगाशी आलीय.. छातीत कळ उगाच येते का.? असा टोला चिले यांनी लगावला आहे.
राज ठाकरेंनी ठाण्यातल्या उत्तरसभेत शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर जहरी टीका केली. शरद पवारांनीही पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांना नागाची उपमा दिली, तर आव्हाडांनी त्यांना कोंबडीचं विशेषणं चिकटवलं. आता ते ही कमी झालं म्हणून अर्धवटराव, तात्या विंचू आणि बॉबी डार्लिंगला राजकीय वादात ओढलं गेलंय... हा वाद आता आणखी किती खालची पातळी गाठणार, कोण जाणे.