व्हिडिओ : लोअर परेल रेल्वे ओव्हर ब्रिज रोड वाहतुकीसाठी बंद
सकाळपासूनच सुरक्षा यंत्रणा वाहतूक रोखण्यासाठी या पुलावर दाखल झालीय
मुंबई : अंधेरी भागातील गोखले पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनानं मुंबईतील अंधेरी, मालाड, वसई या भागांतील काही भाग वाहतुकीसाठी बंद केलाय... त्यातच आजपासून वर्दळीचा असा लोअर परेल स्टेशनबाहेरचा डिलायल रोडओव्हर ब्रिज वाहतुकीसाठी आणि पायी चालणाऱ्यांसाठीही पूर्णत: बंद करण्यात येतोय... महत्त्वाचं म्हणजे, या पुलाचं काम मुंबई महापालिका करणार की रेल्वे? याचा निर्णय अद्याप झालेला नाही. या पुलाचं काम करण्यावरून दोन्ही यंत्रणांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे.
सकाळपासूनच सुरक्षा यंत्रणा वाहतूक रोखण्यासाठी या पुलावर दाखल झालीय. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हँकॉक ब्रिज आणि विद्याविहार ब्रिजप्रमाणेच मुंबई महापालिकेकडून या पुलाचं काम व्हावं, असं रेल्वेचं म्हणणं आहे... तर महापालिकेनंही पत्र लिहून या पुलाचं काम रेल्वेकडून व्हावं, अशी मागणी केलीय.
१९२१ साली बनवण्यात आलेल्या डिलायल रोडओव्हर ब्रिज ६२.७२ मीटर लांब तर २३.२ मीटर रुंद आहे. १७ जुलै २०१९ रोजी आयआयटी, महापालिका आणि पश्चिम रेल्वेद्वारे करण्यात आलेल्या संयुक्त निरीक्षणानंतर हा पूल धोकादायक असल्याचं घोषित करण्यात आलं. आयआयटीनं २० जुलै रोजी पश्चिम रेल्वे आणि महापालिकेला आपला अहवाल सोपवलाय. या अहवालानंतर पोलीस आणि इतर यंत्रणांना हा ब्रिज आजपासून बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.