मुंबई : मनसेचं आज राज्यव्यापी अधिवेशन मुंबईत पार पडत आहे. यासाठी राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. पक्ष नवा झेंडा, नवा विचार आणि नवी वाटचाल घेत पुढे जात आहे. मनसेचा नवा भगवा झेंडा आणि त्यावर विराजमान शिवरायांची राजमुद्रा बरंच काही सांगून जात आहेत. हे नवं भगवं निशाणानं मनसेमध्ये नवा जोश आणि नवी दिशा भरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. शिवसेनेनं महाविकासआघाडीशी घरोबा केल्यापासून राज्यात आक्रमक हिंदुत्वाची पोकळी भरुन काढण्याची मनसेसमोर चांगली संधी होती.


२. एकेकाळी भाजपपेक्षाही शिवसेनेचं हिंदुत्व धारदार होतं. पण सेक्युलर पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसताना शिवसेनेची गोची होणं स्वाभाविक आहे. अशा वेळी भगवं होण्याचं मनसेचं टायमिंग अचूक आहे.


३. हिंदुत्वाच्या झेंडा मिरवणाऱ्या मनसेशी भाजपही जवळीक साधू शकतं.


४. जो हिंदुत्वाची भाषा बोलेल, तो आमचा म्हणत कदाचित संघही मनसेला बळ देऊ शकतो.


५. हल्ली देशात मोदी लिपीच चालते, असं म्हणत मोदींशी जुळवून घेत डॅमेज कंट्रोलला राज ठाकरेंनी आधीच सुरुवात केली आहे.


६. सीएए, एनआरसी या मुद्द्यांनंतर सध्या देशात सरळसरळ ध्रुवीकरणाचे वारे आहेत. अशा वेळी मनसेनं हिंदुत्वाचं निशाण स्वीकारलं आहे.


७. मुळात आक्रमकता हा हिंदुत्वाचा स्थायीभाव आहे. नेता म्हणून राज ठाकरेंची आक्रमकता हिंदुत्वाला पूरक ठरणार आहे.


देशात हिंदुत्ववादी म्हणून प्रतिमा निर्माण करताना मनसेसमोर डोंगरासारखी आव्हानं आहेत. अशा कित्येक सेना आल्या आणि गेल्या, शेवटी हिंदूहृदयसम्राट एकच असं शिवसेनेला वाटतं आहे.


मनसेच्या या नव्या वाटचालीवर भाजपची मात्र सावध प्रतिक्रिया आहे. अख्खं आयुष्य ज्यांनी फक्त हिंदुत्व मिरवलं आणि शिवसैनिकांच्या नसानसांत भिनवलं त्या बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचा मुहूर्त साधत त्यांच्या पुतण्यानं हिंदुत्वाचा नवा नारा दिला आहे. हा नारा बुलंद होणार का? आतापर्यंत भूमिपुत्राच्या हक्कासाठी लढणारी, परप्रांतीयांना चोपणारी, अशी मनसेची प्रतिमा आहे. हिंदुत्वाचा कैवार घ्यायचा असेल, तर मनसेला अख्खा ढाचाच बदलत व्यापक व्हावं लागणार आहे.