दीपक भातुसे, अमित जोशी, झी मीडिया मुंबई : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या विस्तारात अनेक दिग्गजांना स्थान देण्यात आलंय. महाविकास आघाडीप्रणित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. हा मंत्रिमंडळ विस्तार थोडासा आगळावेगळा म्हणावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी संसदीय राजकारण नवीन असलं तरी त्यांचे साथीदार मात्र संसदीय राजकारणातील दिग्गज असे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री असणार आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवलंय. शिवाय त्याआधी त्यांनी महसूल, उद्योगखात्यासारखं तगड्या खात्याचा कारभार पाहिलाय. 


उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील दोन नंबरचं पद अजित पवारांकडं असणार आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, जलसंपदा, अर्थ अशा खात्याचा कारभार पाहिलाय. 


प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड आहे. विधिमंडळातही त्यांच्यासारखा आक्रमक नेता सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं असणं त्यातही दोन नंबरच्या पदावर असणं ही मोठी जमेची गोष्ट मानली जाते. 


विरोधी पक्षनेतेपदाचा अनुभव असलेल्या धनंजय मुंडेच्या रुपानं एक मुलूखमैदान तोफ मंत्रिमंडळात सामील झालीय. दिलीप वळसे पाटील यांच्यासारखा दीर्घकाळ सत्तापदी असलेला मुरब्बी संसदपटू मंत्रिमंडळात आहे.  


उर्जा, उच्च तंत्रशिक्षणमंत्री आणि विधानसभा अध्यक्षपद त्यांनी भूषवलंय. नवाब मलिक यांचाही राज्यमंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय. नवाब मलिकांच्या गाठीशी मंत्रिमंडळ सांभाळण्याचा अनुभव आहे. 


या शिवाय जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, राजेश टोपे, अनिल देशमुख हे अनुभवी आणि आक्रमक नेते मंत्रिमंडळात असणार आहेत. या मंत्र्यांपैकी एकदोघंजण जरी सभागृहात असले तरी ते उद्धव ठाकरेंना एकटं पडू देणार नाहीत.  


संसदीय राजकारणात उद्धव ठाकरे हे नवखे आहेत. असा आरोप केला जात होता. पण त्यांचे अनुभवी सरदार पाहता हे मंत्रिमंडळ असरदार असेल असं म्हणायला हरकत नाही.