Faqt Check | मतदान न केल्यास खरंच बँक खात्यातून 350 रुपये कापले जाणार? पाहा
लोकशाहीतलं पहिलं कर्तव्य न बजावणाऱ्या बेजबाबदार नागरिकांच्या अकाऊंटमधून पैसे कापले जाणार असल्याचा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे.
मुंबई : बातमी एका व्हायरल मेसेजची आहे. मतदानाची सुटी असली की अनेक जण चक्क फिरायला जातात. लोकशाहीतलं पहिलं कर्तव्य न बजावणाऱ्या बेजबाबदार नागरिकांच्या अकाऊंटमधून पैसे कापले जाणार असल्याचा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजची सत्यता आपण पाहणार आहोत. (fact check eci will deduct Rs 350 each from non voting citizens in 2024 Lok Sabha elections see this messege true or false)
सध्या एक मेसेज सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय. लेख स्वरूपातल्या या भल्या मोठ्या मॅसेजमधून करण्यात आलेला हा दावा मतदान न करणाऱ्या नागरिकांची झोप उडवतोय.
मेसेजमध्ये काय म्हंटलंय?
व्हायरल मॅसेजनुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान न करणाऱ्या नागरिकांकडून निवडणूक आयोग प्रत्येकी 350 रुपये कापणार आहे. मतदानाचा अधिकार न वापरणाऱ्यां पाश आवळण्यासाठी आयोगानं हा आदेश काढलाय.
आधार कार्डद्वारे अशा नागरिकांची ओळख पटवण्यात येईल आणि आधारला जोडलेल्या खात्यातून पैसे कापले जातील. आयोगानं यासाठी कोर्टाची आधीच परवानगी घेतल्याचा दावाही या लेखात करण्यात आला आहे. मतदान न करणाऱ्या या लोकांमुळे त्यांच्यासाठी केलेला खर्च वाया जातो. तो वसूल करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या मॅसेजमध्ये म्हटलं आहे.
हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर झी २४ तासच्या टीमनं त्याची शहानिशा केली. पीआयबीच्या ट्विटर हँडलवर आम्हाला याचं स्पष्टीकरण सापडलं.
लोकसभा निवडणुकीत मतदान न करणाऱ्यांच्या बँक खात्यातून 350 रुपये कापले जातील, हा दावा खोटा आहे. निवडणूक आयोगानं असा कोणताही निर्णय घेतला नसून असल्या अफवा शेअर करू नका, असं आवाहन या ट्विटमध्ये करण्यात आलंय.
त्यानंतर आम्ही राज्य निवडणूक आयोगाशी संपर्क साधून त्यांच्याकडून माहिती घेतली. निवडणूक आयोगानंही या मॅसेजमध्ये कोणतंही तत्थ्य नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं.
त्यामुळे मतदान केलं नाही तर 350 रुपये कापले जातील, हा व्हायरल मेसेज झी २४ तासच्या तपासणीत असत्य असल्याचं समोर आलं आहे. मात्र तुमचे पैसे कापले जाणार नसतील तरी मतदान करणं गरजेचंच आहे हे मात्र विसरू नका.