तुम्ही अमूलचं बटर खाताय? एकदा खात्री करूनच घ्या...
भाईंदर जवळच्या काशिमीरामध्ये नकली अमूल बटरचे साठे जप्त
प्रवीण नलावडे, झी मीडिया, भाईंदर : चवीनं खाणाऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. बाहेरची चमचमीत पावभाजी खाताय, सँडविच, पराठा, बटर रोटी खाताय, तर त्यावरचं बटर अमूलच आहे का? याची खात्री करुन घ्या... कारण बनावट बटर तयार करुन ते अमूलच्या पाकिटांत घालून विकणारी एक अख्खीच्या अख्खी कंपनी पोलिसांनी पकडलीय.
भाईंदर जवळच्या काशिमीरामध्ये नकली अमूल बटरचे साठे जप्त करण्यात आलेत. बनावट बटर तयार करणारी एक कंपनीच पोलिसांच्या हाती लागलीय. पोलिसांनी छापे मारले तेव्हा या कंपनीत बनावट बटर तयार करण्याचं काम जोरात सुरू होतं... बनावट बटर तयार करायचं आणि त्याला अमूलसारखं पॅकिंग करुन विकण्याचा धंदा सुरू होता... याबाबतची माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासनानं या कंपनीवर धाड टाकत हजारो किलो बोगस बटरचे साठे जप्त केले. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आलीय, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दिगंबर भोगावाडे यांनी दिलीय.
या कंपनीत तयार केलेलं बटर अमूलच्या पाकिटात भरून बाजारात पुरवले जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. फास्ट फूड कॉर्नर, हातगाडीवरचे खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल इत्यादी ठिकाणी हे बनावट बटर पुरवलं जात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय... यापुढे बाहेरचे पदार्थ खाताना ते बटर नकली नाही ना, याची खात्री करा, किमान खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना त्याबद्दल विचारा...