गणेश कवडे, झी २४ तास, दहिसर-मुंबई : बनावट आयकर अधिकारी बनून फसवणूक करणाऱ्या १३ जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आयकर विभागाचे बनावट अधिकारी बनून एखाद्याला कशारितीने फसवलं जातं हे 'स्पेशल २६' या चित्रपटात आपण साऱ्यांनीच पाहिलं... हे झालं रिल लाइफचं. मात्र असाच काहीसा प्रकार रिअल लाइफमध्येही घडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील दहिसर इथल्या गंगोत्री सोसायटीमध्ये राहणाऱ्या किसन दगडू बेलवडे यांच्या घरी दहा ते बारा जण आयकर अधिकारी म्हणून आले. त्यांनी किसन यांच्याकडे घरात असणारा पैसा दाखवावा अशी मागणी केली. त्यानुसार किसन यांनी आपल्या गावाकडील जमीन, उद्योगतून आलेली घरातील ८० लाख रुपये रोख रक्कम त्या अधिकाऱ्यांच्या हवाली केली. यानंतर या अधिकाऱ्यांनी बनावट पंचनामा केला.


आयकर विभागात येऊन या पैशाची संपूर्ण माहिती देण्यात यावी असे सांगून हे सर्व आरोपी तिथून निघून गेले. मात्र यावेळी कोणत्याही प्रकारची पावती किसन यांना देण्यात आली. त्यामुळे संशय आल्याने बेलवडे यांनी पोलिसांत धाव घेतली, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय कुमार राठोड यांनी दिली. 


सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये हे भामटे कैद झाले होते. या सीसीटीव्ही दृश्यांमध्ये दिसणाऱ्या भामट्या आयकर अधिकाऱ्यांत दोन महिलांचाही समावेश आहे. हे सगळे १३ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडलेत. 



तुमच्या घरी असे भामटे आले तर ते खरेखुरे अधिकारी आहेत का याची खातरजमा करून घ्या. तुम्हाला काही संशय आला तर तात्काळ पोलिसांना माहिती द्या, असं आवाहन पोलिसांनी केलंय.