शेतकरी मोर्चाला आदित्य ठाकरे गैरहजर, हे आहे कारण
आदित्य ठाकरे मोर्चा दरम्यान गैरहजर
मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या भव्य शेतकरी मोर्चाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठींबा जाहीर केलाय. दरम्यान आदित्य ठाकरे मोर्चा दरम्यान गैरहजर दिसले. मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा पण आदित्य गैरहजर अशी चर्चा सुरु झाली. कल्याणमध्ये पत्रीपुलाच्या उद्घाटनात अडकल्यानं ते गैरहजर राहील्याचं बोललं जातंय.
मुख्यमंत्र्यांनी मोर्चाला पाठिंबा असल्याचे कळवले आहे. शेतकरी मोर्चाला आदित्य ठाकरे येणार होते मात्र पत्रीपूलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उशीर झाल्याने ते येणार नाहीत.
कल्याणातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा नविन पत्रीपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑनलाईनद्वारे करण्यात आले. त्यावेळी कल्याण डोंबिवलीतील विकासकामांवर भाष्य करतानाच त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.केंद्राच्या अनेक संस्थांकडे राज्याची कामे अडकून आहेत. एकीकडे अडथळ्यांची शर्यत करायची आणि मग आपली गती मोजायची अशा शेलक्या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
काम करताना एखाद्याच्या तंगड्यात तंगडं घालून पुढे जाऊ द्यायचे नाही आणि दुसरीकडे नावेही ठेवायची. नावं ठेवणं ही सोपी गोष्ट असून अशा व्यक्तींनी आपले नाव कशाला दिले जाईल का? आपले पुढे काय होणार याचाही विचार केला पाहीजे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचे कान उपटले. विकासकामे मग ती केंद्राची असो की राज्य सरकारची. त्यातील अडथळे दूर होणे महत्त्वाचे आहे.
तर नविन पत्रीपुलाच्या कामाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएसआरडीसी अधिकारी राधेश्याम मोपलवार आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करत अत्यंत उपयोगी काम विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केल्याबद्दल शाबासकीची थाप दिली. तर या कामाप्रमाणे शिळफाटा रस्त्याचे कामही आपल्याला विक्रमी वेळेमध्ये पूर्ण करून दाखवा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना दिल्या.