शेतकरी संपाची झळ, दूध-भाजीपाल्यावर परिणाम
कर्जमुक्तीसाठी आणि अन्य काही मागण्यांबाबत राज्य सरकारशी बोलणी फिस्कटल्यानंतर शेतकरी बेमुदत संपावर गेलेत.
मुंबई : कर्जमुक्तीसाठी आणि अन्य काही मागण्यांबाबत राज्य सरकारशी बोलणी फिस्कटल्यानंतर शेतकरी बेमुदत संपावर गेलेत. आजच्या पहिल्या दिवशी संपाला हिंसक वळण लागले. या संपाचा मोठा परिणाम दिसू लागला आहे. दूध-भाजीपाला महागलाय.
शेतीमाला हमीभाव देत नाही आणि कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. शेतकरी संपाला अहमदनगर, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर दूध ओतले, कांदे फेकलेत. तर काही ठिकाणी ट्रक जाळपोळ केली. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. तसेच अहमनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला तसेच दूध विक्रीस नेले नाही. वाहनांचे नुकसान होऊ नये यासाठी जिल्ह्यातील दूध संस्थांनी स्वतःहून दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पुणे,मुंबई ला दूध पुरवठा आपोआप थांबला आहे.
दरम्यान, शेतकरी संपला काँग्रेसने देखील पाठिंबा दिला असून संगमनेर शहरात बाजार समितीच्या गेटवर काँग्रेस आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रास्तारोखोआंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे मुंबईकडे जाणारे ट्रक रोखून धरले तसेच टोमॅटो व भाजीपाला रस्त्यावर फेकला.
रास्तारोको मुळे नाशिक-पुणे हाय वे वरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.'अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून शेतकरी मतावर भाजपने सत्ता काबीज केली पण तीन वर्ष उलटून गेली तरी भाजपने शेतकऱ्यांना एक छडाम सुद्धा मदत केली नाही . भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे.' असा आरोप काँग्रेस चे आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केला. संतप्त शेतकऱ्यांनीही भाजप सरकारची लक्तरे यावेळी आपल्या भाषणात काढली.