मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session 2022) उद्यापासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. आम्हाला चर्चा करण्यावर विश्वास आहे. अनेक दिवसांनंतर 17 ते 18 दिवस चालणारं अधिवेशन आम्हाला मिळालेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडले गेले पाहिजेत हीच आमची भूमिका असेल. पण सरकारी पक्षाची जबाबदारी आहे की चर्चा झाली पाहिजे, असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'शेतकरी प्रश्नावर एल्गार पुकारणार'
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एल्गार पुकारण्याची घोषणा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ज्याप्रकारे विजेचं कनेक्शन कापण्याचं काम या सरकारने सुरु केलं आहे, त्यामुळे  महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिलेली नाही.  मागच्या अधिवेशनात त्यांनी ठामपणे सांगितलं वीज कनेक्शन कापणार नाही. आणि आता स्पर्धा सुरु असल्यासारखं शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहेत. शेतकऱ्यांना आपलं उभं पीक जळताना पाहावं लागत आहे. 


म्हणजे गेली दोन वर्ष अस्मानी संकट आणि आता हे सुलताना संकट शेतकऱ्याला झेलावं लागतंय, याचा जाब आम्ही सरकारला विचारणार आहोत. हे सावकारी सरकार आहे. उर्जामंत्री ज्या प्रकारे वक्तव्य करत आहेत त्यावरुन असं वाटतंय की लोकशाही राज्यात आहोत की तानाशाही राज्यात आहोत असं वाटतंय, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.


ज्या शेतकऱ्यांच्या भरवशावर तुम्ही राज्य करत आहात, त्यांच्या बाबतीत इतकी असंवेदनशीलता, ही अहंकारी भूमिका सरकारने घेतली आहे, तो अहंकार आम्ही तोडायला लावू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 


देवेंद्र फडणवीस यांचं संजय राऊत यांना आव्हान
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आयटी घोटाळा झाला असेल तर कारवाई करा, कुणा थांबवलंय? असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. महाराष्ट्र दाऊदपुढे झुकणार नाही, माझ्या पत्रकार परिषदेप्रमाणे त्यांच्याही पत्रकार परिषद घ्या, फिक्समॅच करु नका, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 


'मराठा आणि ओबीसीविरोधातलं सरकार'
छत्रपती घराण्यातल्या व्यक्तीला उपोषणाला बसावं लागावं ही असंवेदनशीलता या सरकारने बघितली, पुन्हा तीच आश्वासनं देण्यात आली आहेत. त्यामुळे सुरु असलेल्या योजना बंद करण्याचं पाप या सरकारने केलं आहे.  मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन सरकारला घेरणार, ओबीसींवर या सरकारचा इतका राग का आहे, हा प्रश्न आम्हाल पडतो असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.


'बेवड्यांना समर्पित सरकार'
परिक्षांचे घोटाळे अजूनही संपलेले नाहीत. भ्रष्टाचार चरणसीमेला पोहचला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार म्हणून या सरकारचं नाव लिहिलं जाईल. कायदा आणि सुव्यवस्था इतकी वाईट आहे. बेवड्यांना समर्पित असं हे सरकार आहे. या सरकारने लॉकाडाऊनपासून आतापर्यंत दारु करता जेवढे निर्णय घेतलेत, त्यांच्या एक दशांशही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले नाही. यासाठी सरकारविरोधात मोठा एल्गार आम्ही पुकारणार आहोत. या सरकारला उघडं पाडू, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.