दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या स्टॉलवर सध्या एफडीए विभागाने (Food and Drug Administration) लक्ष केंद्रीत केलं असून सुरक्षित अन्न मोहीम सुरू केली आहे. राज्यभरात लाखो लोक रस्त्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ खात असतात. लोकांना स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी एफडीएने विशेष मोहीत हाती घेतली आहे. मुंबईसह मोठ्या शहरात असलेल्या खाऊ गल्ल्यांची पाहणी एफडीएचे अधिकारी करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खाद्यापदार्थांच्या स्टॉल धारकास ड्रेसकोड, हॅण्डग्लोज, कॅप अॅप्रॉन बंधनकारक केलं जात आहे. तर स्टॉलची स्वच्छता, आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता, स्टॉलवर काम करणाऱ्यांची स्वच्छता ठेवण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. 


वर्षाला १२ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या स्टॉल धारकांना नोंदणी बंधनकारक केली जाणार आहे, तर १२ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या स्टॉल धारकांना लायसन्स घेणं बंधनकारक केलं जाणार आहे. 


स्टॉलला रजिस्ट्रेशन किंवा परवाना आहे का? स्टॉलवर काम करणाऱ्या व्यक्तींची स्वच्छता, कपडे, वैद्यकीय तपासणी केलेली आहे का? कच्च्या अन्नपदार्थाचा दर्जा कसा आहे? अन्नपदार्थ तयार करताना, ग्राहकांना पिण्यासाठी, भांडी-स्टॉल स्वच्छ करताना कोणतं पाणी वापरलं जात? स्टॉलवर कचराकुंडी वापरली जाते का? कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ झाकून ठेवले आहेत का? या सर्व बाबी खाद्यपदार्थांच्या स्टॉलबाबत तपासल्या जाणार आहेत.


लोकांनाही खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर अस्वच्छता आढळली तर त्याबाबत त्यांनी एफडीएकडे तक्रार करावी असं आवाहन या विभागातर्फे करण्यात आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ही मोहीम हाती घेण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत.