कृष्णात पाटील, मुंबई : कोरोनामुळे अनेक राज्यांमध्ये दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यातच आता मुंबईतही फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचं एक परिपत्रक मुंबई महापालिकेने जारी केले आहे. दिवाळी काही दिवसांवर आली आहे. पण यंदा फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे दिवाळीची मज्जा कमी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ नोव्हेंबर २०२० रोजी फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी सोसायटीचे अंगण / घराचे अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरूपाचे फटाके जसे की, फुलबाजी (फुलझडी), अनार (कोठी / झाड) यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात येत आहे. मात्र, हे करताना नागरिकांनी कोविड विषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यावयाची आहे. यामध्ये प्रामुख्याने मास्क वापरणे, शारीरिक दुरीकरण पाळणे व साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची काळजी घ्यावयाची आहे. असं या परिपत्रकात म्हटले आहे.


मुंबईकरांसाठी यंदाची दिवाळी मात्र शांत शांत असणार आहे. दिवाळीत मुंबईत मोठ्या प्रमाणात फटाके फोडून दिवाळी साजरी केली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे दिवाळीवर देखील काही निर्बंध आले आहेत.


कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. याआधी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी यंदा सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी घालण्यावर विचार सुरु असल्याचं म्हटलं होतं.


मुंबईच्या आधी अनेक राज्यांमध्ये फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फटाक्यांच्या धुरामुळे कोरोना रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.