सलमानच्या घराची रेकी, पनवेलमध्ये भाड्याचे घर; फार्महाऊसही टार्गेटवर, आरोपींकडून मोठा खुलासा
Firing at Salman Khans Home: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
Firing at Salman Khans Home: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. हाय प्रोफाइल परिसरात झालेल्या गोळीबारामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सलमानच्या घराजवळ गोळीबार करणाऱ्या आरोपींची ओळख पटली असून त्यांना ताब्यातदेखील घेण्यात आले आहे. आरोपींकडून महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. तर, या प्रकरणात अनेक खुलासेही समोर आले आहेत.
मुंबई पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुजरातच्या भूज येथून अटक केली आहे. आरोपींच्या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचा प्लान गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून आखला जात असल्याचे समोर आले आहे. तसंच, आरोपींनी पनवेलमध्ये भाडेतत्वावर घर घेतले होते. तिथूनच आरोपींनी फार्म हाऊस आणि गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी केल्याचं, प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रिक्षा चालकाच्या मदतीने पनवेलमध्ये भाडे तत्त्वावर घर घेतले होते. तेथे ते सुमारे २१ दिवस राहिले. यावेळी त्यांनी स्वत:चे खरे आधारकार्ड पुरावे म्हणून दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पनवेलमध्ये भाडेतत्वावर एक फ्लॅट घेतला होता. तसंच, सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची तब्बल चार वेळा रेकी करण्यात आली. तसंच, सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसची रेकी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आरोपींची फार्म हाऊसवर देखील हल्ला करण्याचा कट होता, असा संशय पोलिसांना आहे.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. गोळीबार करणारे दोन्ही आरोपी गेल्या एक महिन्यांपासून पनवेलमध्ये राहत होते. तसंच, त्यांनी पनवेलमधीलच एका रहिवाशाकडून विकत घेतली होती. त्यात दुचाकी नेमक्या कोणत्या कारणासाठी खरेदी करत केली, याची कोणतीही माहिती दुचाकी मालकाना दिली नव्हती. पोलिसांनी दुचाकी मालक आणि दोन एजंट यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांचेही जबाब नोंदवले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल उर्फ कालू असं आरोपीचे नाव असून तो राजस्थानच्या रोहित गोदर टोळीचा शूटर आहे. आरोपी विशालने महिनाभरापूर्वीच सचिन नावाच्या व्यक्तीची हत्या केली होती. विशाल हा लॉरेन्स बिष्णोई टोळीचा प्रमुख गुंड रोहित गोदारचा विश्वासू मानला जातो. सलमानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी माउंट मेरी चर्च जवळ दुचाकी सोडली. त्यानंतर ते रिक्षाने वांद्रे स्थानकात पोहोचले व तिथून नवी मुंबईच्या दिशेने गेले, असे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर या प्रकरणाची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोईचा लहान भाऊ अनमोल बिष्णोईने स्वीकारली आहे. तशी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. ही पोस्ट पोर्तुगाल देशातून अपलोड करण्यात आल्याचे आयपी अॅड्रेसवरून दिसून येत आहे.