तेजस एक्सप्रेसमधील जेवणातून २५ प्रवाशांना विषबाधा
सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास चिपळूण स्थानकात जेवणाचे डबे गाडीत आणण्यात आले.
मुंबई: तेजस एक्स्प्रेसमधील जेवणातून २५ प्रवाशांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. करमाळीहून (गोवा) मुंबईला येणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला. यावेळी जेवणात देणात आलेल्या भाजीमुळे प्रवाशांना विषबाधा झाली. जेवल्यानंतर काहीवेळातच प्रवाशांना उलट्या होऊ लागल्या. यानंतर हा सारा प्रकार लक्षात आला.
प्रवाशांनी याचा जाब विचारल्यानंतर कंत्राटदाराकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने त्यांनी प्रतिसाद नोंदवहीमध्ये तक्रार दाखल केली. तसेच याबाबतचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला. रेल्वेने या व्हीडिओची दखल घेऊन कंत्राटदारावर कारवाई केली आहे. कंत्राटदाराला १ लाखांचा दंड आकारण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास चिपळूण स्थानकात जेवणाचे डबे गाडीत आणण्यात आले. साडेआठच्या सुमारास प्रवाशांना जेवण दिल्यानंतर नऊच्या सुमारास प्रवाशांना त्रास होऊ लागला. यामुळे बहुतांश प्रवासी पनवेल स्थानकात उतरल्याचे सांगण्यात आले. 'तेजस'मध्ये जेवण पुरवण्याचे कंत्राट महिन्याभरापूर्वी Aron केटरर्सला देण्यात आले.
सामान्यपणे भाजी थंड झाल्यावर डब्यात भरणे अपेक्षित असते. गाडीत ती गरम करून प्रवाशांना ती वाढावी असा नियम आहे. मात्र, भाजी गरम असतानाच पाकिटांमध्ये भरल्याने ती खराब झाल्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच शताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना बुरशी आलेले सँडविच देण्यात आले होते. त्यामुळे ३६ प्रवाशांना विषबाधा झाली होती. यानंतर काही दिवसांतच तेजस एक्स्प्रेसमध्ये विषबाधेचा प्रकार घडल्याने रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.