माझ्यासाठी महाराजांपेक्षा कोणीच मोठे नाही- छत्रपती संभाजीराजे
रायगड संवर्धनाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्यामुळे संभाजीराजे संतप्त
मुंबई: माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणीच मोठे नाही. त्यामुळे रायगड संवर्धनाच्या कामात कोणतीही चूक व्हायला नको, असे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले. ते रविवारी मुंबई प्रसारमाध्यमांशी बोलत होते. खासदार संभाजीराजे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. रायगड संवर्धनाच्या नावाखाली सुरु असलेल्या फसवणुकीमुळे होत असलेली अस्वस्थता त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली.
रायगड संवर्धनाचे काम अशाचप्रकारे चालणार असेल तर मला जबाबदारीतून मुक्त करा, असे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले. मात्र, रायगड संवर्धनाचे काम तुम्हीच करा, तुमच्याशिवाय कोणी दुसरी व्यक्ती हे काम करु शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
गेल्या सरकारने रायगड संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपये दिले होते. मात्र, दोन वर्षात एक टक्काही काम झालेले नाही. छत्रपतींचा वंशज म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. रायगड संवर्धनाच्या कामात चूक व्हायला नको. महाराजांपेक्षा माझ्यासाठी कोणीही मोठे नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन झाले. जे लोक भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत त्यांची चौकशी केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
तत्पूर्वी संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट लिहूनही आपली नाराजी व्यक्त केली होती. रायगडच्या संवर्धनासाठी रायगड विकास प्राधिकरण काम करते. गडकिल्ल्यावर भ्रमंतीसाठी येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना सोयीसुविधा देण्यासाठी किंवा संवर्धनाच्या कामासाठी काही करायचे झाल्यास पुरातत्व खात्याकडून सातत्याने आडकाठी केली जाते. नियमांवर बोट ठेवून कामांना स्थगिती दिली जाते. मग 'रोप वे'साठी रायगड विकास प्राधिकरणाला न विचारता परवानगी दिलीच कशी गेली? अशा बेकायदा कामांना चाप लावण्यासाठी संबंधितांवर गुन्हे का दाखल केले गेले नाही, असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी विचारला होता.