मुंबई : विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यासाठी विधिमंडळातून सहा ज्येष्ठ आमदारांची यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. यापैकी एकाची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राज्यपाल निवड करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधाकृष्ण विखे पाटील, कालिदास कोळंबकर, बबनराव पाचपुते, बाळासाहेब थोरात, के. सी पाडवी, दिलीप वळसे पाटील या सहा आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. 


महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर शनिवारी भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्मथनातून शिवमहाआघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता असतानाच, शनिवारी संपूर्ण राजकीय खेळी पलटली.


अजित पवार यांनी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला समर्थन देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शरद पवार यांनादेखील याबाबतची कोणतीही कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतर, राष्ट्रवादीने त्यांची विधिमंडळ पक्षनेते पदावरून हकालपट्टी केली. आता दिलीप वळसे पाटील यांची विधिमंडळ पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे. स्थिर सरकार जोपर्यंत राज्याला मिळत नाही तोपर्यंत विधिमंडळ नेतेपदाचे अधिकार आता प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहेत.