भारताच्या सागरी सीमेवर येणाऱ्यांची सक्तीनं तपासणी करा, मनसेची मागणी
आपल्या एका नजर चुकीमुळे पुन्हा समाजात कोरोनाचे वावटळ उठणे नक्कीच अहितकर ठरेल.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : भारताच्या कुठल्याही सागरी सीमेवर येणाऱ्या जहाजातील प्रत्येक कर्मचारी, अधिकारी आणि कामगारांची सक्तीने तपासणी करून १४ दिवस त्यांना विलगीकरण कक्षात ठेवा, अशी मागणी मनसेनं केली आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोना व्हायरसने सागरी दळणवळणात देखील प्रवेश केला आहे. दुबई येथील नौकेतल्या कर्मचाऱ्यांना कोविड१९ ची लागण झाली असल्याने त्यांची आपत्कालीन सुटका करण्यात आली.
भारतात तर मोठी बंदरे आहेत आणि सागरी मार्गाने कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून,भारतीय बंदरांवर येणाऱ्या प्रत्येक नौकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी यांची कोविड १९ तपासणी करून त्यांना सक्तीने १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवावे. तसेच त्या संबंध नौकेचे सॅनेटाईसेशन करण्यात यावे. ह्याच प्रकारे समुद्रात जाणाऱ्या नौकांवरील लोकांची देखील काही दिवस आधी तपासणी करून मग त्यांना जाण्यास परवानगी द्यावी. संपूर्ण देश कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून लॉक डाऊन आहे. आपल्या एका नजर चुकीमुळे पुन्हा समाजात कोरोनाचे वावटळ उठणे नक्कीच अहितकर ठरेल.
याच्याशीच निगडीत दुसरे मह्त्वाचे म्हणजे बीपीटी अंतर्गत सर्व सागरी किनाऱ्यावरील जहाजे (कोस्टल शिप्स), हद्दीत असणाऱ्या, उभ्या असणारी परदेशी जहाजे आणि ऑफशोअर रिग्ज यावर असणाऱ्या सर्व कर्मचारी, कामगार व अधिकारी (सीमॅन्स) यांची तपासणी तातडीने सुरु करण्यात यावी.
शिवाय प्रत्येक बोटीवर या आपत्कालीन परिस्थितीशी लढण्यासाठी व्हेंटिलेटर, संबंधित उपकरणे, मास्क, सॅनिटायझर यांची व्यवस्था करावी अशी मागणी मनसे नाविक सेनेचे कार्याध्यक्ष निशांत गायकवाड यांनी केली आहे या संदर्भात केंद्रीय जहाज व बंदरे मंत्रालयाकडे मनसेकडून पाठपुरावा करण्यात आला आहे.