मोदींच्या गुजरातमध्ये परकीय गुंतवणूक दुप्पट; महाराष्ट्राची पत घसरली
परकीय गुंतवणुकीत आकृष्ट करण्यात कर्नाटक राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्याचा २०१९-२० चा आर्थिक पाहणी अहवाल गुरुवारी विधिमंडळात सादर झाला. या अहवालानुसार राज्यात रोजगार कमी होण्याबरोबरच परकीय गुंतवणुकीचा ओघही आटला आहे. मात्र, याच काळात शेजारच्या गुजरातमध्ये विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण तब्बल दुप्पटीने वाढल्याचे अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
गुजरातमध्ये २०१८-१९ मध्ये १२ हजार ६१८ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली होती. तर २०९१-२० मध्ये त्यात दुपट्टीने वाढ होऊन ती २४ हजार १२ कोटी रुपये होणे अपेक्षित आहे. याउलट गेल्यावर्षी महाराष्ट्रात ८० हजार १३ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली होती. यावर्षी हे प्रमाण २५ हजार ३१६ कोटीपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकृष्ट करणाऱ्या देशातील अव्वल राज्याचा मान महाराष्ट्राकडून हिरावला गेला आहे. परकीय गुंतवणुकीत आकृष्ट करण्यात कर्नाटक राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.
यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालातही सिंचनाची आकडेवारी नाही
तसेच उद्योग, सेवा क्षेत्र, रोजगार अशा सर्वच आघाड्यांवर राज्याची घसरण झाली आहे. तर आर्थिक मंदीमुळे राज्याचा जीडीपीही ७.५ टक्क्यांवरून ५.७ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याची बाब अहवालातून समोर आली आहे.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. २०१८-१९ या वर्षात महाराष्ट्रात ७३ लाख ५० हजार रोजगार उपलब्ध होते. गेल्या वर्षभरात यामध्ये घट होऊन रोजगाराचा आकडा ७२ लाख ३ हजारावर आला आहे. याचा अर्थ राज्यातील रोजगारात १ लाख ४७ हजारांची घट झाली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण खूपच जास्त आहे. सध्याच्या घडीला राज्याचा बेरोजगारी दर ८.३ टक्के इतका आहे. गुजरातमध्ये हेच प्रमाण ४.१ टक्के आहे.