मुंबई : मुंबई ड्रग पार्टीत (Mumabi Drugs Case) अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला (Aryan Khan) तब्बल 25 दिवसांनंतर जामीन मंजूर झाला. मुंबई उच्च न्यायालयात सलग तीन दिवस झालेल्या सुनावणीनंतर आर्यन खानला जामीन देण्यात आला. आर्यन खानची आज जेलमधून सुटका होणार होती, पण जामीन अर्जाची प्रत पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे त्याची आणखी एक रात्र कारागृहातच जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यन खानला जेलमधून बाहेर काढण्यासाठी किंग खान शाहरुखने हाय प्रोफाईल वकिलांची फौज उभी केली. आर्यन खानला जामीन मिळवून देणारे मुकुल रोहतगी यापैकीच एक वकील.


आर्यन खान प्रकरणात एन्ट्री?


मुंबई ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानचा जामीन सत्र न्यायालयाने नामंजूर केला. यानंतर मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांनी एनसीबीवर (NCB) टीका करत केंद्रीय तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली होती. आर्यनला जेलमध्ये ठेवण्याचं एनसीबीकडे ठोस कारण नाही, आर्यन खानला केवळ एक सेलिब्रेटी म्हणून किमत चुकवावी लागत आहे, असं रोहितगी यांनी म्हटलं होतं. यानंतर असं म्हटलं जातं की आर्यन खान प्रकरणात मुकुल रोहतगी यांना आणण्यात आलं.



कोण आहेत मुकुल रोहतगी?


मुकुल रोहतगी सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आहेत. त्याआधी 2014 ते 2017 या कालावधीत रोहतगी देशाचे चौदावे अॅटर्नी जनरल होते. 66 वर्षांचे मुकुल रोहतगी यांनी 2011 ते 2014 या कालावधीत अॅडशिन सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम पाहिलं आहे.


मुकुल रोहतगी यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये वकील म्हणून काम पाहिलं आहे. 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगल प्रकरणात रोहतगी यांनी गुजरात सरकारतर्फे कोर्टात खटला लढवला. बेस्ट बेकरी केस, जाहिर शेख प्रकरण, योगेश गौडा हत्या प्रकरण आणि बहुचर्चित जस्टिस लोया प्रकरणात (Justice Loya case) रोहतगी यांनी वकील म्हणून काम पाहिलं.


मुकुल रोहतगी किती घेतात मानधन?


मिळालेल्या माहितीनुसार रोहतगी एका सुनावणीचे जवळपास 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक मानधन आकारतात. जस्टीस लोया प्रकरणात महाराष्ट्र सरकारने मुकुल रोहतगी यांना 1.21 कोटी रुपये दिले होते. RTI अंतर्गत ही माहिती देण्यात आली आहे.