एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अँटिलिया प्रकरणात दिलासा; सुप्रीम कोर्टातून मिळाला जामीन
Mumbai News : अँटिलिया बॉम्ब प्रकरण (antilia bomb case) आणि व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर 21 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकांनी भरलेले वाहन आढळले होते. त्यानंतर 5 मार्च 2021 रोजी ज्या एसयूव्ही वाहनात स्फोटके होती तिचे मालक व्यावसायिक हिरन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला होता. या दोन्ही प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्यावर आरोप ठेवून त्यांना जून 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर प्रदीप शर्मा यांच्या जामिनावर सुनावणी पार पडली. यावेळी प्रदीप शर्मा यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि एनआयएतर्फे हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांचा युक्तिवाद ऐकला. "प्रदीप शर्मा हे 37 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेले आदरणीय पोलीस अधिकारी होते.निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. शर्मा यांचा वाझेशी संबंध असल्याचे प्रत्यक्ष पुरावे नाहीत. शर्मा यांच्यावर हिरेनच्या हत्येत केवळ कारस्थान रचल्याचा आरोप आहे. शर्मा वाझे यांना भेटले पण यादरम्यान काय घडले हे समोर आलेले नाही," असे रोहतगी यांनी कोर्टाला सांगितले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं जामिनाबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर मंगळवारी कोर्टानं जामीन मंजूर केला आहे.
Antilia bomb scare | Supreme Court grants bail to former police officer Pradeep Sharma arrested in connection with the Antilia bomb scare case and the killing of businessman Mansukh Hiren. pic.twitter.com/lEZeAHfFO7
— ANI (@ANI) August 23, 2023
कोण आहेत प्रदीप शर्मा?
प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलात एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जात होते. 100 हून अधिक चकमकींचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. शर्मा 1983 मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले होते आणि 2019 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी राजकारणात एंट्री घेतली. प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला. यानंतर, अँटिलियाच्या प्रकरणानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. याप्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठतीत आहेत.
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अँटिलिया प्रकरणात दिलासा; सुप्रीम कोर्टातून मिळाला जामीन