पालकमंत्रिपदाची माळ गणेश नाईकांच्या गळ्यात पडणार?

मंत्रिपदाचा आणि खातेवाटपाचा वाद संपताच आता पालकमंत्रिपदावरुन महायुतीत नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 26, 2024, 08:51 PM IST
पालकमंत्रिपदाची माळ गणेश नाईकांच्या गळ्यात पडणार?

Ganesh Naik : ठाण्याच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वनमंत्रीपदी विराजमान झालेल्या गणेश नाईकांना ठाण्याचे पालकमंत्री नेमलं जाण्याची शक्यता आहे. ठाण्याचं पालकमंत्रिपद हे तसं शिवसेनेकडं होतं. 

एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे होते. जेव्हा  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा देखील शिंदे यांच्या विश्वासातील शंभूराज देसाईंना पालकमंत्रिपद देण्यात आले होते. पण आता यावेळी शिवसेनेला मंत्रिपद देण्याच्या मानसिकतेत भाजप दिसत नाहीये.

ठाण्याचे पालकमंत्रिपद भाजपकडे असणार?

ठाण्याचं पालकमंत्रिपद भाजपला स्वतःकडे हवंय. ठाण्याचं पालकमंत्रिपद गणेश नाईकांसारख्या नेत्याकडे देऊन महापालिका निवडणुकीसाठी ताकद देण्याचा प्रयत्न राहणार आहे. शिवाय एकनाथ शिंदेंसमोर त्यांच्याच होमग्राऊंडवर एक मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

भाजपचे नऊ आमदार

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघापैकी 15 मतदार संघात महायुतीचे आमदार आहेत. त्यापैकी भाजपचे 9 तर, शिवसेना शिंदे गटाचे 6 आमदारांचा समावेश आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व आहे. असे असले तरी, यंदाच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 9 आमदार निवडून आले आहेत. ज्या पक्षाचे उमेदवार जास्त त्याच्याकडे पालकमंत्री आहे.

गणेश नाईक आणि शिंदेंमध्ये संघर्ष

ठाणे लोकसभा मतदार संघातून गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक भाजपकडून इच्छुक होते. मात्र, त्यावेळी शिवसेनेने ठाणे लोकसभेवर दावा करत शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाईक यांनी शिंदे विरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर विधानसभेत महायुतीत असताना ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे महेश चौघुले उभे राहिले होते. शिंदेंकडून चौघुलेंवर कोणतीच कारवाई झाली नसल्याने गणेश नाईक आणि शिंदे यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे.

भाजपनं गणेश नाईकांना ठाण्याचं पालकमंत्रीपद दिल्यास डीपीडीसीवर भाजपचं वर्चस्व निर्माण होईल. शिवाय एमएमआरडीएसारख्या संस्थामधून मोठ्या प्रमाणात विकासनिधी मिळू शकेल. आमदार जास्त असूननही शिवसेनेला पालकमंत्रिपद देण्याचा मनाचा उदारपणा भाजप दाखवणार की गणेश नाईकांना पालकमंत्रिपद देऊन ताकद देणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x