#Dongri : मृतांचा आकडा १४ वर; अजूनही काही रहिवाशी ढिगाऱ्याखाली
बचावकार्य अद्यापही सुरुच
मुंबई : डोंगरी परिसरात असणारी जवळपास १०० वर्षे जुनी इमारत मंगळवारी कोसळली. या दुर्घटनेमध्ये मंगळवारपासून मृतांच्या आकड्यात भर पडत आहे. एएनाय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुसार सध्याच्या घडीला मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. रात्रीच्या सुमारास या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आणखी दोन मृतहेद बाहेर काढण्यात आले. बचावदलाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना लवकराच लवकर बाहेर काढण्यासाठी श्वानांचीही मदत घेण्यात येत आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणि बचावकार्यादरम्यान बाहेर काढण्यात आलेल्या रहिवाशांपैकी एकूण ९ जण अद्यापही गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या दलाकडून अतिशय वेगाने बचावकार्य सुरु असून अजूनही काही रहिवाशी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं कळत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील पाच ते सहा तास हे बचावकार्य असंच सुरु राहणार अशीही माहिती मिळत आहे.
मंगळवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही इमारत कोसळली आणि डोंगरी परिसरात एकच हाहाकार पाहायला मिळाला. प्रत्यक्षदर्शींनी इमारत कोसळतानाच्या क्षणंचं केलेलं वर्णन एकताना ऐकणाऱ्यांचाही थरकाप उडत होता. इमारत कोसळण्याचं वृत्त कळताच बचाव दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावलकार्यास सुरुवात केली. या घटनेनंतर म्हाडा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ कारभारावर विरोधकांनी निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. आरोप प्रत्यारोपांच्या या सत्रात संबंधित इमारतीच्या पुनर्विकासाचं काम ज्या विकासकाच्या हाती सोपवण्यात आलं होतं, त्याच्यावरही निशाणा साधण्यात आला.
नेतेमंडळी, पालिका आयुक्त आणि अनेकांनीच या परिसराला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. पण, त्यांच्या येण्याने आणि घटनास्थळी असणारी गर्दी, चिंचोळ्या वाटा यांमुळे बचावकार्यात मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्या. दरम्यान, पुन्हा एकदा अनधिकृत बांधकाम, काही अंशी प्रशासनाचा बेजबाबदारपणा आणि मुंबईत होणाऱ्या या अशा दुर्घटनांचं सत्र थांबणार कधी असाच प्रश्न उपस्थि केला जात आहे.