मुंबई : नालासोपाऱ्यात उघड्या गटारात 4 वर्षांचा चिमुरडा बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेला 30 तास उलटल्यानंतरही मुलाचा शोध लागत नसल्यामुळे त्याचे कुटुंबीय चिंताक्रांत झाले आहेत. शहरात दोन दिवसांपासून पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. यावेळी पावसात खेळायला बाहेर गेलेला अमोल सिंग हा मुलगा उघड्या गटारात पडला. नालासोपाऱ्यातील तुलिंज येथील बिलालपाडा भागातील ही घटना आहे. बेकायदा बांधकामांमुळे पाणी साचण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार याला कारणीभूत असल्याचा आरोप होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे, भाईंदरमधील मुन्शी कंपाऊडमध्ये एक 9 वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेला. आज दुपारी 3.00च्या दरम्यान मुन्शी कंपाउंड इथं 9 वर्षांचा अब्दूल रेहमान खेळता खेळता नाल्यामध्ये पडून वाहून गेला. या घटनेची माहिती मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन पथकाला मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन शोध कार्य सुरू आहे. शोधकार्यात अडचणी येत असल्याने अग्नीशमन पथकाच्या जवानांनी नाला तोडून शोधमोहीम सुरू ठेवली आहे..


मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या तर काही ठिकामी संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. 
मुलुंडच्या अंबिकानगर परिसरात असलेल्या फारस सोसायटीची संरक्षक भिंत नाल्यामध्ये कोसळली आणि नाल्याचं सगळं पाणी सोसायटीच्या आवारात शिरलं. तळमजल्यावरच्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. त्यामुळे घरातल्या सामानाचं मोठं नुकसान झालं.