मुंबई : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या संकल्पनेतून 18 वर्षांवरील पुरुषांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणी 17 सप्टेंबर 2023 पासून सुरू करण्यात आलेल्या 'निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे' अभियानांतर्गत आतापर्यंत 1 कोटी पुरुषांच्या मोफत आरोग्य तपासणीचा (Health Checkup) टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. या अभियानांतर्गत राज्यातील सुमारे 4 कोटी 67 लाख लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अभियानांतर्गत 4 डिसेंबर 2023 पर्यंत 18 वर्षांवरील 1 कोटी 72 हजार पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी 92 लाख लाभार्थ्यांच्या आवश्यक त्या चाचण्या आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आलेल्या असून त्यापैकी सोळा लाख लाभार्थ्यांना औषधोपचार देण्यात आले आहेत. सुमारे तेरा हजार लाभार्थ्यांवर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया (Surgery) सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या आहेत. ही मोहीम 31 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर गरजेनुसार मोहिमेचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.


आरोग्यवर्धिनी केंद्र उपकेंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील सामुदायिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय या स्तरावर रुग्णांना आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व आरोग्य संस्थांमध्ये 18 वर्षे वरील पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक चाचण्या, गरजेनुसार ईसीजी, सिटीस्कॅन, एक्स-रे इत्यादी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत आणि गरजेनुसार रुग्णांना आवश्यक शस्त्रक्रिया सार्वजनिक जारोग्य विभाग अंतर्गत रुग्णालयांमध्ये मोफत केल्या जाणार आहेत.


त्याचप्रमाणे, गरजेनुसार रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी वैद्यकीय महाविद्यालय आणि शासनमान्य महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणीकृत केलेल्या रुग्णालयांमध्ये संदर्भित केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री डॉ.सावंत यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या 'निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे' या अभियानासाठी विशेष अॅपची निर्मिती करण्यात आलेली आहे. या अॅपच्या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी तसंच वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत रुग्णांची नोंदणी, त्यांना दिलेले औषध उपचार तसेच करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया, करण्यात आलेल्या चाचण्या, या माहितीची नोंद त्या ठिकाणी केली जाते.