देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबईतील रस्त्यावर गर्दी होत आहे. सणासुदीच्या काळात मिठाईची विक्रीदेखील जोरात सुरु असते. दरम्यान मिठाई सेवनाने विषबाधेचे प्रकार घडू नये यासाठी मुंबई महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. खाद्य पदार्थ विकणाऱ्या आस्थापनांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने आहे. तसेच आगामी काळात वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक त्यांच्या आपापल्या कार्यकक्षेतील मावा, मिठाईची दुकाने, मावा साठवणूक शीतगृह यांची कसून तपासणी करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते सण-उत्सवांच्या कालावधीत विशेष खबरदारी घेत असते. त्याच अनुषंगाने मुंबई शहरात मावा-मिठाई विकणाऱ्या आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे.


या पार्श्वभूमीवर नागरिकांना विषबाधा होऊ नये म्हणून महानगरपालिकेचे सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांना 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या काळात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी आणि नाताळ इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे.


सणासुदीच्या कालावधीत अन्न विषबाधासारखी कोणतीही घटना घडणार नाही यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी आपआपल्या विभागांत मिठाई विषबाधेबाबतची भित्तीपत्रकांचे वाटप करावे व जनजागृती करावी, असेही निर्देशित करण्यात आले आहे व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मिठाईचा रंग बदलत असल्यास / उग्र वास येत असल्यास अथवा बुरशी दिसल्यास अशा मिठाई पदार्थांचे सेवन करू नये व असे पदार्थ आढळल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याच्या विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी.