Ganesh Visarjan 2023 : मुंबईतील वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल, पाहा कोणते रस्ते वाहनांसाठी बंद
Ganesh Visarjan 2023 : गणपती विसर्जनाच्या निमित्तानं मुंबईतील पालिका प्रशासनही सज्ज असून यामध्ये मुंबई पोलिसांची वाहतूक शाखाही सहकार्य करताना दिसत आहे.
Ganesh Visarjan 2023 : मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही रस्त्यांवरील वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू बीच आणि विसर्जन मार्गांमध्ये येणाऱ्या काही रस्त्यांवर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक शाखेकडून काही बदल करण्यात आले आहेत.
गिरगावमधील वाहतूक व्यवस्था....
गिरगावमध्ये दादासाहेब भडकमकर मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, पंडिता रमाबाई मार्ग या रस्त्यांवर वाहतूक मार्ग बंद असणार आहेत. तर, वाळकेश्वर मार्ग, जेएसएस मार्ग, एम एस अली मार्ग, पठ्ठे बापुराव मार्ग, जवाजी दादाजी मार्ग (ताडदेव रोड), जहांगीर बोमन बेहराम मार्गांवर एकाच बाजूनं वाहतूक सुरु असेल.
दादरमधील वाहतूक मार्गांमधील बदल...
दादरमध्ये अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, रानडे रोड, संत ज्ञानेश्वर मंदिर मार्ग, जांभेकर महाराज मार्ग, केळुसकर मार्ग, एम बी राऊत मार्ग वाहतुकीसाठी बंद राहतील.
हेसुद्धा वाचा : Ganesh Visarjan 2023 LIVE: मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणुका एका क्लिकवर
भायखळ्यामध्ये डॉ. बीए रोडवर वाहतूक बंद असेल. तर, परळमधील साने गुरुजी मार्ग बंद असेल. तर, बापुराव जगताप मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, नायगाव क्रॉस रोड आणि किंग एडवर्ड मार्गावरही वाहतूक धीम्या गतीनं सुरु राहील.
उपनगरांमध्ये काय परिस्थिती?
वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार पश्चिम उपनगरांमध्ये टागोर रोड, जुहू तारा रोडचा उत्तर भाग, जुहूमधील जनार्दन म्हात्रे रोड आणि जुहू बीच मार्ग येथे वाहतूक बंद राहील. तर सांताक्रुझमध्ये वैकुंठलाल मेहता मार्ग, इंद्रवदन ओझा मार्ग, दामू आण्णा दाते रोड, बंदर पाखाडी रोड, टी जंक्शन ते मार्वे चौपाटी आणि कांदीवलीतील मार्वे रोड या रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्यात येईल.
वरील वाहतूक मार्गांव्यतिरिक्त मुंबईमध्ये अवजड वाहनांच्या वाहतुकीवर काही निर्बंध लावण्यात आले असून, दक्षिण मुंबईच्या दिशेनं येणारी ही वाहतूक रात्री 12 ते शुक्रवारी सकाळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.