Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाचे वेध आतापासूनच अनेकांना लागले आहेत. किंबहुना कोकणकरांनी तर, गणपतींच्या स्वागतासाठी गावाकडे जायच्या तारखाही ठरवल्या आहेत. महाराष्ट्र आणि त्यातूनही मुंबईत मोठ्या स्तरावर साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाच्या धर्तीवर आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह इतरही अधिकाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. जिथं पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रायोगिक स्तरावर काही प्रमाणात शाडू माती उपलब्ध करुन देण्याचे निर्देश परिमंडळीय उपायुक्तांना देण्यात आले. सोबतच महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात एक जागा शाडू मातीपासून श्रीगणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तीकारांना मोफत उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही देण्यात आले. इतकंच नव्हे, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठी आकारलं जाणारं शुल्क आणि अनामत रक्कम माफ करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. 


घरगुती गणेशोत्सवासाठी कोणते नियम? 


यंदाच्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान घरगुती स्तरावरील 4 फूट उंची मूर्ती फक्त केवळ शाडू माती, पर्यावरणपूरक घटकांपासून घडवलेल्या असणं बंधनकारक असेल असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. तर, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर घरगुती गणेशोत्सवासाठी प्रतिबंध असणार आहे. त्यामुळं ज्यांच्या घरांमध्ये बाप्पा विराजमान होतात त्यांनी ही बाब लक्षात घ्यावी. 


हेसुद्धा वाचा : Weather Forcast : सुट्टीच्या निमित्तानं घराबाहेर पडणार असाल तर होरपळाल; राज्यात चिंताजनक तापमानवाढ 


गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना अनेकजण प्राधान्य देत आहेत. पण, अद्यापही काही घरांमध्ये मात्र पीओपीच्याच मूर्ती आणल्या जात असल्याची बाबही नाकारता आली नाही. पीओपीच्या मूर्तीं पर्यावरणाच्या दृष्टीनं हितकारक नाहीत ही बाब लक्षात आल्यानंतर आता प्रशासनानंच नागरिकांना शाडूच्या मूर्तींना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. 


कधी आहे यंदाचा गणेशोत्सव? 


मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्शी गणेशोत्सव काहीशा उशिरानं सुरु होणार आहे. 19 सप्टेंबर 2023 ला, मंगळवारीच गणेश चतुर्थी असून, या मंगलपर्वाची सुरुवात होणार आहे. ज्यानंतर 20 सप्टेंबरला दीड दिवसांच्या गणपतींचं तर, 23 सप्टेंबरला गौरी गणपतींचं विसर्जन आहे. 28 सप्टेंबरला यंदाच्या वर्षी अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळं या तारखा पाहा आणि आतापासूनच बाप्पाच्या आगमानासाठी तयारीला लागा. कारण, उरले फक्त 4 महिने...