मुंबई : नवी मुंबई परीसर आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर एकट्या-दुकट्या प्रवाशाला लुटणारी परप्रांतीय टोळी कार्यरत होती. या टोळीने एका महिन्यात अनेक जणांना लुटलं आहे. आरोपींना पकडण्यात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाच्या युनिट- २ ला यश आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईतील नेरुळमध्ये राहणारे एच.ऐ.आगवणे. एमटीएनएलमधील कर्मचारी आहेत. मुलीच्या कॉलेज प्रवेश करीता १९ जुलैला सायंकाळी पुणे येथे जायला निघाले होते. नेरुळ येथील सायन-पुणे हायवेवर बसची वाट बघत होते. यावेळी लुटारू पांढऱ्या रंगाच्या अॅसेन्ट कारमध्ये आले. आगवणे यांना पुण्याला जायला लिफ्ट दिली. कार नेरुळहुन बेलापूरला पोहचताच पिस्तूलाचा धाक दाखवून त्यांच्याकडून १३ हजार रुपये आणि सोन्याची चेन काढून घेतली.


आगवणे यांच्या प्रमाणेच संतोष राठोड या तरुणाला अशाच प्रकारे लुटले. संतोष २२ जूनला सातारा येथे आपल्या गावी जाण्यासाठी नेरुळ हायवेवर उभा होता. आरोपींनी कारमध्ये घेतलं. पुढे एक्स्प्रेस मार्गावर न जाता पनवेलकडे गाडी नेली. पिस्तूल दाखवून, मारहाण करत ATM कार्ड घेतले. त्यातून ६५ हजारांची रक्कम काढली. सोन्याची साखळी घेत डोळ्याला पट्टी बांधून तब्ब्ल चार तास गाडीतून फिरवलं.


पुण्यातील स्टेट बँकेचे वरीष्ठ व्यवस्थापक सुधीर जालनापुरे यांनाही पुण्याहून मुंबईकडे येताना चार लाखांना लुटलं आहे. त्यांनाही तब्बल पाच तास गाडीत फिरवून लुटलं होतं. झी २४ तासचे वृत्त निवदेक गिरीश निकम यांच्यावरही खालापूर टोलनाक्याच्या पुढे असाच प्रसंग आला होता. झी २४ तासनं याबाबत वृत्त दाखवताच तपासाला वेग आला होता. हे आरोपी दिल्लीचे आहेत. गुन्हे करुन आरोपी दिल्लीला विमानानं पळून जात असतं. अशा गुन्ह्यांमुळे मुंबईचं प्रवेशव्दार असलेले नवी मुंबई शहर आणि एक्स्प्रेस हायवे अधिक सुरक्षित करण्यात यंत्रणा कमी पडते आहे. एव्हढं मात्र खरं.