मुंबई: चेंबूर भागात बलात्कार झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तिच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरु होते. मात्र, रक्तस्त्रावामुळे तिची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, हे प्रयत्न अखेर फोल ठरले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये ही मुलगी आपला भाऊ आणि वहिनीसोबत राहत होती. चार अज्ञातांनी गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. ७ जुलै रोजी हा धक्कादाक प्रकार घडला होता.


या घटनेनंतर पीडित मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यामुळे संबंधित मुलीने हा प्रकार कुणासमोर उघड केला नाही. मात्र, २५ जुलैपासून या मुलीची प्रकृती बिघडली त्यामुळे तिला कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय चाचणीत मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. 


त्यानंतर ३० जुलै रोजी औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी 'झिरो एफआयआर' दाखल करत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. औरंगाबादच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारांना तिचे शरीर प्रतिसाद देत नव्हते. नराधामांनी केलेल्या अत्याचारांमुळे मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. या धक्क्यातून तिला अखेरपर्यंत सावरता आले नाही. तिच्या शरीरातून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. डॉक्टरांनी या मुलीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, पीडितेचा जीव वाचवण्यात त्यांना अपयश आले.