मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासह विधीवत पूजा करून गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरेही उपस्थित होते.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तुझ्या आगमनानंतर जगावरंच कोरोनाचं संकट नष्ट होऊ दे, तुझ्या चमत्काराची प्रचिती जगाला येऊ दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गणरायापुढे केली. तसंच उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवा, गर्दी करु नका, एकमेकांपासून अंतर ठेवून राहा. सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क लावा, सतत हात धुवा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं. 



'कोरोना संकटात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचं गणपती मंडळांनी आणि नागरिकांनी ठरवलं, त्याबद्दल धन्यवाद', असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच शासकीय निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना केली.