अरुण मेहेत्रे / कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना काहीसा दिलासा मिळणार आहे. पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना इथं स्वस्त दरात औषधं तसंच इम्प्लांटसाठी आवश्यक उपकरणं मिळणार आहेत. मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये देशाच्या विविध भागातून ५० लाखांहून अधिक रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना पालिकेच्या शेड्यूलमध्ये असणारी औषधे मोफत दिली जातात. मात्र नॉन शेड्यूल औषधे, इम्प्लांटसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी बाहेरून विकत घ्याव्या लागतात. यामुळे गरीब रुग्णांना जादा पैसे खर्च करावे लागतात. रुग्णांची ही अडचण दूर करण्यासाठी आता २१ रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधांची दुकाने सुरु करण्यात येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या नागपूर आणि रायपूर इथे ही सुविधा सुरू असून बीएमसी अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन याबद्दल माहिती घेतल्याचं महापालिका प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. रमेश भारमल यांनी म्हटलंय.


जेनेरिक औषधे म्हणजे काय?


एखाद्या आजारावर काही कंपन्या संशोधन करून त्यावर औषध शोधतात. या औषधांवर ब्रँड नसतो आणि ज्याची किंमत ब्रँडेडपेक्षा खूप कमी असते. मात्र, ब्रँडेड औषधांमध्ये जे गुणधर्म, प्रमाण असते तेच जेनरिक औषधांमध्ये असते. त्यामुळे गरिब रुग्णांना याचा फायदा होतो.


जेनेरिक औषधांचा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी देशपातळीवर जनजागृती होतेय. ही औषधे सहजरित्या सर्वत्र उपलब्ध होण्यासाठी जेनरिक औषध दुकानांची संख्या वाढणं गरजेचे आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेनं एक चांगलं पाऊल उचललं असल्याचं म्हटलं जातंय.