मुंबई : रात्रभराच्या कसून चौकशीनंतर घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी प्रमुख आरोपी सुनील शितपला पोलिसांनी आज सकाळी अटक करण्यात आल्याची माहिती दिलीय. शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्किटेक्ट आणि कंत्राटदार यांना या धोक्याची कल्पना असूनही त्यांनी इथल्या नर्सिंग होमच्या नुतनीकरणाचं काम सुरूच ठेवलं होतं... त्यामुळे, त्यांनाही पोलीस लवकरच ताब्यात घेणार असल्याचं समजतंय.


घाटकोपरच्या दामोदर पार्क परिसरातील साई दर्शन अपार्टमेंट कोसळून सतरा जणांचा मृत्यू झालाय. याच इमारतीच्या तळमजल्यावर शितपचं नर्सिंग होम होतं. या नर्सिंग होममध्ये नुतनीकरणाचा घाट घातला होता. या दरम्यान इमारतीच्या मूळ ढाचा धक्का लागल्यानं दुर्घटना घडली, असा स्थानिकांचा आरोप आहे.


त्यानुसार शितपला काल रात्री पोलीसांनी ताब्यात घेतलं. रात्रभर चौकशी केल्यावर आज सकाळी त्याला अटक करण्यात आलीय. सकाळी शितपला विक्रोळी कोर्टात हजर करून त्याची पोलीस कोठडी घेतली जाणार आहे. 


काल सकाळी साडे दहाच्या सुमारास घाटकोपरची साई दर्शन ही चार मजली इमारत अचनाक कोसळली. तेव्हापासून अग्निशमन दल, एनडीआरएफ, महापालिकेचे कर्मचारी, पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी मिळून बचावकार्य केलं. 


त्यात आतापर्यंत ११ जणांना वाचवण्यात यश आलंय., तर १७ जण ढिगाऱ्याखाली दबून अथवा जखमी अवस्थेत रुग्णालयात हलवताना मृत्यूमुखी पडलेत.