मुंबईतील काचेच्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
काचेच्या बिल्डिंग घातक ठरु शकतात.
मुंबई : मुंबईमध्ये आपल्याला अनेक काचेच्या बिल्डिंग पाहायला मिळतात. मात्र या काचेच्या बिल्डिंग घातक ठरु शकतात. अंधेरी इथं नुकत्याच लागलेल्या आगीमुळे काचेच्या बिल्डिंग किती सुरक्षित आहेत ? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबईतील या काचेच्या बिल्डिंग म्हणजे कॉर्पोरेट दुनियेचा चकाचक चेहरा आहे. संपूर्ण मुंबईभर आपल्याला अशा संपूर्ण काचेनं बनवलेल्या अनेक बिल्डिंग्ज पाहायला मिळतात. बाहेरुन अतिशय आकर्षक आणि चकाचक दिसणाऱ्या या बिल्डिंग्ज किती सुरक्षित असतात हा प्रश्न आहे. कारण मुंबईत जेव्हा ग्लास ब्लेझिंग बिल्डिंग्ज बांधायला सुरुवात झाली तेव्हा अग्निरोधक काचा वापरण्याबाबतच्या सूचना वारंवार अग्निशमन दल आणि संबंधित प्रशासनाकडून बजावण्यात आल्या.
मात्र पूर्वीच्या अनेक बिल्डिंग्जना अग्निरोधक काचा बसवण्यात आल्या नाहीत. जर काचा दर्जेदार नसेल तर आग लागल्यावर या काचा वितळतात आणि खाली पडून फूटतात. नवीन बांधण्यात आलेल्या बिल्डिंग्जना अग्निरोधक काचा बसवण्यात जरी येत असल्या तरी ठराविक काळानंतर त्यांचं मेंटनन्स करणं गरजेचं आहे. याखेरीज नियमानुसार त्या बसवणं गरजेचं आहे. अन्यथा दुर्घटना घडू शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
जर अग्निरोधक मटेरियल वापरलं नसेल तर काचेच्या बिल्डिंग्जना आग लागण्याचा धोका हा अधिक असतो. अग्निरोधक काचा जरी बसवल्या असल्या तर या यंत्रणा मेंटनं ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तसंच त्या हाताळण्याचं प्रशिक्षणही दिलं गेलं पाहिजे. काचा कशा पद्धतीनं बसवल्या जाव्यात आणि प्रत्येक काचेमध्ये किती अंतरावर काचा खुल्या ठेवाव्यात याचीदेखील नियमावली आहे. त्याचं पालन होणं गरजेचं आहे.
अनेक काचेच्या बिल्डिंग्ज या बाहेरुन अगदी आरशाप्रमाणे सरळ दिसतात. बिल्डिंग्जना मोठ्या आणि खुल्या खिडक्या दिसत नाहीत. हेदेखील धोकादायक असतं. याखेरीज खिडक्या आणि मजल्यांना सज्जाच नसल्यानं आग एका मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर सहज पसरु शकते. अशा काचेच्या बिल्डिंग बांधताना नॅशनल बिल्डिंग कोडनं अनेक सूचना केल्या आहेत. मात्र यातील सर्वच सूचनांची अंमलबजावणी सगळे बांधकाम व्यावसायिक करतातच असं नाही. यामुळे मोठा घात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.