गो एअरच्या तिकीटांवर भरघोस सूट; अवघ्या १,३१३ रुपयात करा प्रवास
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही तिकीटे देण्यात आली.
मुंबई: सध्या गो एअरलाईन्स कंपनीच्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांना तिकिटांवर भरघोस सूट दिली जात आहे. यंदा गो एअरलाईन्सचा १३ वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने कंपनीने ग्राहकांना एक विशेष ऑफर देऊ केली आहे. यामुळे ग्राहकांना अवघ्या १,३१३ रुपयांत प्रवास करता येईल. ५ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या या ऑफरचा कालावधी रविवारी म्हणजे १८ तारखेला संपुष्टात आला.
या ऑफरमध्ये ग्राहकांना पुढील वर्षाच्या ४ नोव्हेंबरपर्यंत तिकिटांचे बुकिंग करण्यात येणार होते. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही तिकीटे देण्यात आली. मात्र, एकदा बुकिंग झाल्यानंतर ही तिकीटे रद्द किंवा त्यांचे हस्तांतरण करता येणार नाही.
गो एअर या कंपनीची २००५ मध्ये स्थापना करण्यात आली होती. नुकतीच गो एअरलाईन्सने आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरु केली. मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली येथून फुकेत आणि माले या दोन ठिकाणी जाण्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे. याशिवाय, सध्याच्या घडीला गो एअरलाईन देशांतर्गत २३ ठिकाणी जाण्यासाठी हवाई सेवा पुरवते. यासाठी गो एअरलाईन्सच्या विमानांच्या दररोज २३० फेऱ्या होतात.