मुंबईतील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी
या कार्यक्रमाला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि पर्यटन मंत्री रावल उपस्थित होते.
मुंबई : येत्या ४ ऑगस्ट पासून दादर-शिर्डी कायम स्वरूपी साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन सुरू होत आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी हिरवा झेंडा दाखवून या सेवेला सुरूवात केली. या कार्यक्रमाला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि पर्यटन मंत्री रावल उपस्थित होते.
२२१४७/२२१४८ या क्रमांकाची ही नवी ट्रेन प्रत्येक शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता दादर रेल्वे स्टेशन येथून निघून शनिवारी पहाटे ३.४५ वाजता, शिर्डीच्या साईनगर स्टेशनला पोहचेल. साप्ताहिक असलेली ही ट्रेन लवकरच रोज सोडण्याचे नियोजन रेल्वेने आखले आहे.
शिर्डीत येत्या ऑक्टोबरपासून साई समाधी शताब्दी महोत्सवास प्रारंभ होणार आहे. देश-विदेशातील भाविक यांची मोठी गर्दी होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने शिर्डीसाठी नव्या ट्रेन सुरू करण्याचे धोरण आखले आहे. ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, कोपरगाव असे थांबे ही ट्रेन घेणार आहे.
मुंबईकरांना सहा तासात शिर्डीला पोहचता येईल. प्रत्येक शनिवारी हीच ट्रेन शिर्डीहून सकाळी साईनगरशिर्डी स्टेशन येथून सकाळी ९.२० वाजता सुटेल. दादर रेल्वे स्टेशनला दुपारी ३.२० वाजता पोहचेल. एकूण १७ कोच असलेल्या या ट्रेन मध्ये २ एसएलआर, ६ जनरल, ७ स्लीपर, १ वातानुकुलीत टू टायर, १ वातानुकुलीत थ्री टायर असे कोच देण्यात आले आहेत.