मुंबई : पश्चिम रेल्वेवर मुंबई ते सूरत मार्गावर चालणाऱ्या गाड्यांमध्ये प्रथम श्रेणी पासधारकांना नवीन स्वरुपातील डबे लवकरच पुरवण्यात येणार आहेत. या मार्गांवरील गाड्यांमध्ये प्रथम श्रेणीचे डब्यांचे उत्पादन बंद करण्यात येत असल्याने ही सुविधा सुरू देण्यात येणार आहे. सध्या या गाड्यांमध्ये जनरल डब्यांमध्येच प्रथम श्रेणीच्या प्रवाशांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे होणारी अडचण लक्षात घेत या प्रवाशांसाठी नवीन आकर्षक स्वरुपातील डबे पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई ते सूरतमध्ये धावणाऱ्या गाड्यांमध्ये प्रथम श्रेणीचे डबे जोडणे बंद करून त्या प्रवाशांना जनरल डब्यांमध्ये स्वतंत्रपणे प्रवासाची सुविधा दिली आहे. पण त्यातून वादाचे प्रसंग उद्भवत असल्याने पश्चिम रेल्वेने नवीन डब्यांची योजना केली आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रथम श्रेणीचे डब्यांचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. 


पश्चिम रेल्वेने हे बदल करताना मुंबई सेंट्रलमधील कोचिंग विभागाची मदत घेतली आहे. त्यांना नव्या डब्यांचा साज देताना रंगसंगतीसह अन्य बदल केले आहेत. सोमवारपासून वांद्रे टर्मिनस ते सूरत इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये त्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर फ्लाइंग राणी, वलसाड पॅसेंजरमध्येही बदल होणार आहेत.


या डब्यांवर प्रथम श्रेणी असे स्पष्टपणे नमूद केले आहे. या डब्यांबाहेर वारली चित्रकृतीचा समावेश असलेले चित्रदृश्य चितारले आहे. त्यासह उत्तम दर्जाची आसने, सामान ठेवण्यासाठी जागा, एलईडी, मोबाइल चार्जिंग, बायो टॉयलेट्स आदींचा समावेश आहे.