दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम परीक्षा न घेण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या भूमिकेवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी युजीसीला पत्र लिहून राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी भूमिका मांडली होती. मात्र राज्याचे राज्यपाल आणि सर्व विद्यापीठाचे कुलपती या नात्याने भगतसिंग कोश्यारी या भूमिकेवर चांगलेच भडकले आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही सविस्तर पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदय सामंत यांनी या प्रकरणात लुडबूड करू नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी त्यांना द्याव्येत, अशी खरमरीत सूचना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. त्यांची ही लुडबूड युजीसीच्या नियमांचं उल्लंघन करणारी आहेच, त्याचबरोबर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६च्या तरतुदींचं उल्लंघन करणारीही आहे, असं कोश्यारी म्हणाले आहेत. 


अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेणं हे युजीसीच्या नियमांचं उल्लंघन आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यापीठांचं हीत लक्षात घेऊन विलंब न करता मुख्यमंत्र्यांनी हा विषय मार्गी लावावा, असे निर्देश राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. 


अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी देणं हे योग्य नसून ते विद्यापीठ कायद्याचं उल्लंघन करणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे सर्वाधिकार आणि कर्तव्य विद्यापीठांचं आहे. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केल्यास त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणावर आणि नोकऱ्यांवर होईल, अशी चिंता राज्यपालांनी व्यक्त केली आहे.