मुंबई : मुंबईतल्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या प्रकरणावरुन विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोलही केला. आता स्वत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. महिला सुरक्षेसंदर्भात दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर या अधिवेशनात चर्चा करण्यात यावी असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमुद केलं आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणी हे विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाला हे पत्र मिळाल्याची माहिती आहे. 


विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाकडून घेतला जातो. त्यामुळे राज्यपालांच्या या पत्रानंतर आता राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


राज्यपालांना नैतिक अधिकार नाही


दरम्यान, राज्यपालांना असे निर्देश देण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. राज्यपालांची कार्यपद्धती संविधानावर हल्ला करणारी आहे, राज्यपालांनी राजकारणी म्हणून वागू नये, अशी अपेक्षा असते, कारण ते राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात, असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. हा राज्याचा, संविधानाचा आणि जनतेचा अवमान असल्याचंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.