मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निरोप देण्यात आला. मुंबईत राजभवन झालेल्या एका साध्या कार्यक्रमात विद्यासागर राव यांना निरोप देण्यात आला. विद्यासागर राव यांच्या ऐवजी आता भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. ५ सप्टेंबरला नवे राज्यपाल पदभार स्वीकारणार आहेत. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व मंत्रिमंडळ सदस्य तसेच राज्यातील जनतेचे आभार मानले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना राजभवनावर भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यासागर राव यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमानंतर लगेचच राज्यपाल सपत्निक हैदराबादकडे रवाना झाले.



यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण व क्रीडामंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलीस आयुक्त संजय बर्वे, प्रधान सचिव राजशिष्टाचार नंदकुमार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


महाराष्ट्राचे नवे राज्यपाल हे भगतसिंह कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. उत्तराखंड राज्य अस्तित्वात आल्यानंतर कोश्यारी हे भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर एका वर्षासाठी त्यांनी मुख्यमंत्रीपदही भूषवले. 2009 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेवर खासदार म्हणून होते.


दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय हे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून तर हिमाचलचे विद्यमान राज्यपाल कलराज मिश्रा यांना राजस्थानात पाठवण्यात आलं आहे. काँग्रेसचे माजी नेते मोहम्मद अरीफ खान हे केरळच्या राज्यपालपदी तर तमिलसाई सुंदरराजन यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे.