रिक्षा - टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा अनिवार्य
रिक्षा, टॅक्सीमधील प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी राज्य सरकारने कडक पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता रिक्षा - टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा अनिवार्य करण्यात येणार आहे. तशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली.
मुंबई : रिक्षा, टॅक्सीमधील प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी राज्य सरकारने कडक पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता रिक्षा - टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा अनिवार्य करण्यात येणार आहे. तशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली.
ठाणे शहरातील रिक्षाचालकांच्या अरेरावीबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली होती. त्यावेळी डॉ. रणजित पाटील यांनी ही माहिती दिली. ठाण्यात रिक्षाचालकांची मुजोरी सुरु आहे. तर काही ठिकाणी महिलांना मारहाण आणि त्यांना रिक्षात छेडछाड सारख्या प्रकरांना सामोरे जावे लागले होते. तसेच काही प्रमाणात टॅक्सीमध्येही अरेरावी चालते. तसेच भाडे देण्यावरुन भांडणे होणे, हे प्रकार होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
रिक्षामध्ये महिलांसोबत छेडछाड होण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांसोबतच शहरात रिक्षा चालक महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत चालला असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान, प्रवासादरम्यान महिलांसोबत घडणाऱ्या घटना यामुळे रिक्षात जीपीएस सिस्टीम पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडली जावी, अशी मागणी महिला रिक्षा चालकांनी केली होती.
वसई-विरार शहरात मनामनी भाडे आकारणी करून रिक्षाचालकांनी सर्वसामान्य प्रवाशांची लूट चालवली गेली. मात्र त्यांच्याविरोधात तक्रारीही करता येत नव्हत्या. प्रशासकीय यंत्रणा बंद होती. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मुजोर रिक्षाचालकांची दादागिरी निमूटपणे सहन करावी लागत होती. त्यामुळे आता जीपीएस यंत्रणेमुळे याला लगाम बसू शकणार आहे.