फूड कंपन्यांकडून ग्राहकांची लूट, मुंबईत मॅकडोनाल्डचे शटरच बंद
मॅकडोनल्ड आणि स्टारबक्स सारख्या बड्या बहुराष्ट्रीय फूड कंपन्या ग्राहकांची कशी लूट करतायत, याचं धक्कादायक उदाहरण समोर आले आहे.
मुंबई : मॅकडोनल्ड आणि स्टारबक्स सारख्या बड्या बहुराष्ट्रीय फूड कंपन्या ग्राहकांची कशी लूट करतायत, याचं धक्कादायक उदाहरण समोर आले आहे.
जीएसटीसह 136 रुपयांचं बील
पेशाने उद्योजक असलेल्या नीलोत्पल मृणाल यांना सीएसएमटी स्टेशनसमोरच्या मॅकडोनाल्डमध्ये हा अनुभव आला. गेल्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी मॅक स्पायसी पनीर ऑर्डर केलं, तेव्हा त्यांना 18 टक्के जीएसटीसह 136 रुपयांचं बील भरावं लागलं.
जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर
केंद्र सरकारनं अलिकडंच हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणला. गुरूवारी नीलोत्पल पुन्हा एकदा मॅकडोनाल्डमध्ये गेले. मात्र त्याच स्पायसी पनीरसाठी त्यांना पुन्हा 136 रूपयेच मोजावे लागले.
मॅकडोनाल्डनं खाद्यपदार्थाची किंमत वाढवल्यात
सरकारनं जीएसटी कमी केला असला तरी मॅकडोनाल्डनं खाद्यपदार्थाची किंमत वाढवल्यानं ग्राहकांना तेवढीच रक्कम द्यावी लागतेय. याचाच अर्थ सरकारच्या तिजोरीत जाणारी कराची रक्कम आता या बहुराष्ट्रीय फूड कंपन्यांनी आपल्या खिशात घालायला सुरुवात केलीय.
मॅकडोनाल्डचं शटरच बंद
दरम्यान, या सगळ्या गैरप्रकाराबद्दल जेव्हा आम्ही मॅनेजरकडं विचारणा केली तेव्हा तो चांगलाच भडकला. मला काय विचारता, रेट का वाढवले ते कंपनीला विचारा. असं तो सांगत होता. झी मीडियाच्या या मोहीमेमुळे ग्राहकांना आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आलं तेव्हा त्यानं मॅकडोनाल्डचं शटरच बंद करून टाकले.