गारव्यामुळे H1N1चे विषाणू सक्रीय, स्वाईन फ्लूचा धोका वाढला
स्वाईन फ्लूचा धोका पुन्हा वाढला.
मुंबई : पावसाळ्यात हवेत जाणविणाऱ्या गारव्यामुळे एचवन-एनवनचे विषाणू पुन्हा सक्रीय झाले असून स्वाईन फ्लूचा धोका कायम असल्याचं चित्र दिसून येतं आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे तीन नवे रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या सहा महिन्यांत १८३ रुग्णांना स्वाईनबाधा झाल्याने येत्या काळात स्वाईन फ्लूबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला डॉक्टरांतर्फे दिला जात आहे.
उशिरा हजेरी लावलेल्या पावसाने जोरदार बरसात सुरू केली आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. वातावरणातील बदलांमुळे स्वाईन फ्लूचा धोका अधिक वाढल्याचं डॉक्टरांतर्फे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत ठाण्यात तब्बल ९६ रुग्णांची नोंद घेण्यात आली असून पावसाळ्यातही याच शहरात स्वाईनचा धोका असल्याचे दिसून आले. त्यापाठोपाठ आतापर्यंत भाईंदरमध्ये ३८, कल्याणमध्ये ३१, तर नवी मुंबईमध्ये १६ रुग्णांची नोंद घेण्यात आली होती.
अंगदुखी, डोकेदुखी, ताप, सतत नाकातून पाणी येणं ही वातावरणातील बदलामुळे येणाऱ्या तापाची लक्षणे आहेत. स्वाईन फ्लू हा तापाचाच प्रकार असल्याने त्याची लक्षणे देखील साधारणपणे सारखीच असतात. परंतु, त्यात काही सुक्ष्म फरक असतो. स्वाईन फ्लूची लक्षणे अधिक गंभीर असून ती ४-५ दिवस राहतात.
ताप येतो तेव्हा अंग, स्नायू दुखू लागतात. डोकेदुखी आणि कफ देखील जाणवतो. त्याचबरोबर नाकातून सतत पाणी वाहणे, घसा खवखवणे, दुखणे असे त्रास होऊ लागतात. अनेकजण ताप, सर्दी, खोकला याकडे तितक्या गंभीरतेने बघत नाहीत आणि वातावरणातील बदलामुळे त्रास होत असेल असा विचार करतात. कफ आणि सर्दी यामुळे फुफ्फुसांचे किंवा श्वसनमार्गाचे आजार होतात. श्वसनमार्गाचे आरोग्य बिघडते, फुफ्फुसांचे आजार होतात आणि व्हायरल फिव्हरला सामोरे जावे लागते.