शिवसेना नेत्याची दिवाकर रावतेंवरच टीका
शिववाहतूक सेनेच्या मेळाव्यात आज संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुंबई : शिववाहतूक सेनेच्या मेळाव्यात आज संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रावते जातीवाचक उल्लेख करून कार्यकर्त्यांना भेटणे टाळतात असा आरोप शेख यांनी केला.
परिवहन मंत्र्यांनी गेल्या तीन वर्षात रिक्षा चालकांसाठी एक स्टँड सुद्धा बांधलाय का? असा जळजळीत सवाल हाजी अराफत यांनी केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षातील सर्व वाहतूक संघटनांचे नेतृत्व दिलं. पण उद्धव ठाकरेंचे आदेशही पाळले जात नसल्याची तक्रार अराफत यांनी केली.
हाजी अराफत शेख यांनी वाहतूक सेनेचं प्रमुख पद सोडण्याचीही तयारी दाखवली आहे. शेख यांच्या बंडानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असणारे खासदार अनिल देसाई आणि मंत्री अर्जून खोतकर यांनी हाजी अराफत यांना सबुरीचा सल्ला दिला. गैरसमजुतीतून काही प्रकार घडला असावा. पक्षात उद्धव ठाकरे यांचा आदेश अंतिम असतो. 19 तारखेच्या उद्धव ठाकरे यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत शेख यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासनही यावेळी देसाई आणि खोतकरांनी दिलं.
पाहा काय म्हणाले हाजी अराफत शेख