मुंबई : मुंबईत शिवसेनेच्या महाआरतीमध्ये मुस्लीम बांधव उत्साहानं सहभागी झाल्याचं दिसलं. तर पुण्यातही मुस्लीम बांधवाच्या हस्ते हनुमंताची आरती करण्यात आली. तिकडे नाशिकमध्ये हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचं स्वागत मुस्लीम बांधवांनी केलं. यवतमाळमध्ये तर थेट मुस्लीम तरुणांनी हनुमान चालिसाचं पठण करून धार्मिक एकोप्याचा धडा दिला. राजधानीनं महाराष्ट्राकडून शिकावं, अशीच ही सगळी उदाहरणं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादरमधील शिवसेनेच्या महाआरतीमध्ये मुस्लिम बांधवही सहभागी होणार आहेत. दादर स्टेशनजवळ असलेल्या पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिरात ही आरती होतेय. त्यासाठी मुस्लिम तरूणही पोहोचले आहेत.


सोलापूर जिल्ह्यातील एका मुस्लिम दामपत्याने हनुमान जन्मोत्सव साजरा करत जाती धर्माच्या भिंती पाडण्याचे काम केले आहे. माळशिरस तालुक्यातील श्रीपुर मधील नाजीया आणि मोहसीन पठाण या दामपत्याने हनुमान जन्मोत्सव साजरा केला आहे. यानिमित्ताने महाप्रसाद आणि समाज प्रबोधन कीर्तन कार्यक्रम ठेवला आहे. मोहसीन पठाण हे लहानपणा पासूनच स्वतःच्या धर्माप्रमाणे हिंदू सणही साजरे करतात.



नाशिकमध्ये हनुमान जयंती मिरवणुकीचं मुस्लिम बांधवांनी जल्लोषात स्वागत केलं. हातात भगवे झेंडे घेत हिंदू मुस्लिम ऐक्याचं त्यांनी अनोखं दर्शन घडवलंय. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश पवार यांनीही मुस्लिम बांधवांची गळाभेट भेटून त्यांचं स्वागत केलं.