लाख आव्हाने येवोत..बलशाली प्रजासत्ताक करूया..!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
मुंबई : असीम त्याग, समर्पण आणि अनेकांचे हौतात्म्य यातून साकारलेले भारतीय प्रजासत्ताक आणखी बलशाली करूया. लाख आव्हाने येवोत, त्यांना परतवून लावण्याची हिमंत बाळगुया, त्यासाठी आपण वज्रमुठ करूया, असं आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापन दिनाच्या पुर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय प्रजासत्ताकाचे हे वैभव मिरवतानाच आपण येणाऱ्या पिढ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदेल यासाठी निर्धार करूया, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी थोर स्वातंत्र्यसेनानींसह अनेकांनी सर्वस्वाचा त्याग केला. अगणित अशा वीरांनी हौतात्म्य पत्करलं. त्यांना अभिवादन करताना विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील एकात्मता अखंड रहावी यासाठी वचनबद्ध व्हावे लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
आव्हाने तर येतातच. मग ती नैसर्गीक असोत की मानवनिर्मित त्यांना परतवून लावण्याची हिंमत आपल्याला बाळगावी लागेल. त्यासाठी सर्वांना एकजुटीने, एकदिलाने काम करावे लागेल.
वैभवशाली अशा या भारतीय प्रजासत्ताकाचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवताना आपल्याला त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदेल यासाठी काळजी घ्यावी लागेल. नैसर्गीक साधन संपत्ती, पर्यावरण आणि मानवाचा विकास यांचा समतोलही साधावा लागेल. त्यासाठी आपण निर्धार करूया. यातूनच आपले भारतीय प्रजासत्ताक आणखी बलशाली होईल, असा विश्वास आहे.
त्यासाठी आणि भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या, त्याग, समर्पण करणाऱ्या शूरवीरांना विनम्र अभिवादन, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.