प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. नववर्ष स्वागतासाठी मुंबई पोलीस दलही सज्ज झालंय. त्यामुळे बेशिस्तपणे वागाल तर मात्र तुम्हाला तुरुंगात जावं लागेल हे लक्षात असू द्या. कारण, सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाच्या स्वागता दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केलाय. दोन दिवसांसाठी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात. मुंबई पोलिसांसह फोर्स वन, एसआरपीएफ, क्यूआरटीच्या पथकांची अतिरिक्त कुमकही तैनात करण्यात आली आहे. झोपडपट्ट्यांसह उच्चभ्रू वस्त्यांमध्येही कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. अनेक भागांत पोलीस साध्या वेषात गस्तीवर आहेत. बॉम्बशोधक आणि नाशक पथक, श्वान पथकांच्या मदतीने गर्दीच्या परिसरात वारंवार तपासणी केली जाणार आहे. गिरगाव चौपाटी, माहीम चौपाटी, जुहू चौपाटी, गेटवे आणि वेगवेगळ्या ठिकाणी विशेष बंदोबस्त लावण्यात आले आहेत. उपायुक्त दर्जाचे पोलीस अधिकारीही बंदोबस्तासाठी तैनात असतील. महत्त्वाच्या ठिकाणी लाईव्ह सीसीटीव्ही मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. तर मुंबई शहरातल्या पाच हजार कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांची छेडछाड रोखण्यासाठी महिला पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आलीत. मुंबईच्या वाहतूक शाखेकडूनही तयारी पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी मार्गात बदल करण्यात आला असून पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत लाऊड स्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलीय. 


मुंबईकरांना बोट पार्टी मात्र करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फटाके वाजवता येतील. मुंबईतील वाईनशॉप आणि बार रात्री दीड वाजेर्यंत सुरु राहतील. मात्र ज्या रेस्टॉरंट, बार किंवा हॉटेल मालकांनी परवानगी मागितली असेल त्यांना पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात येईल.


ठिकठिकाणी सीसीटीव्ही असले तरी पोलीसांच्या विशेष पथकांकडेही कॅमेरे देण्यात आलेत. त्यामुळे  सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचं स्वागत करताना हुल्लडबाजी करु नका... कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा...