दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : माजी मंत्री आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चां रंगली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या 'विधानगाथा' पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी पाटील यांनी आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्र्याची भेट घेतली. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता जिल्हा परिषद सदस्य झाल्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांचं अभिनंदनही केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भेटीवर हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं की, 'मी लिहिलेल्या विधानगाथा या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. देवेंद्र फडणवीस आमदार असताना त्यांनी अर्थसंकल्पावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्यांनी मला संसदीय कामकाज मंत्री म्हणून नियंत्रण दिलं होतं. हा कार्यक्रम आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. हा सर्वपक्षीय कार्यक्रम आहे, मुख्यमंत्र्यांबरोबर शरद पवार आणि मी ज्या मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलं त्या सगळ्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित केलं आहे.'


'लोकसभा निवडणुकीत मी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळला आहे. आमच्या मतदारसंघात लोकसभेला मी जो शब्द दिला तो पाळला आहे, आता जबाबदारी आहे. आम्ही त्यांचे काम प्रामाणिकपणे केलं आहे, आता त्यांनी ठरवायचे आहे मतदारसंघाबाबत काय भूमिका घ्यायची आहे. आता मला खात्री आहे आघाडीचा धर्म पाळण्यासाठी ते योग्य भूमिका घेतील.'


इंदापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस की राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार यावरून सध्या राजकीय वाद आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला नाही तर हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. त्यामुळेच हर्षवर्धन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.


२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी स्वंतत्र लढले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. पण आता आघाडी झाल्याने दोघांपैकी एकालाच ही जागा मिळणार आहे.