मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने २६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी असलेल्या अबू जुंदालवरील खटल्यावर स्थगिती दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अबू जुंदालला अटक केली होती. बचाव पक्षाने अबु जुंदालच्या प्रवासाच्या कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र, ही कागदपत्रे महत्त्वाची असून बचाव पक्षाला देण्यास सुरक्षा यंत्रणांनी नकार दिला होता. या विरोधात बचाव पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान पुढील सुनावणी पर्यंत उच्च न्यायालयाने अबु जुंदाल विरोधात चालवण्यात येणाऱ्या खटल्यावर तात्पुरती स्थगित दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

११ जून रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. २६/११ च्या मुंबई हल्यादरम्यान पाकिस्तानातील कंट्रोल रूममध्ये बसून दहशतवाद्यांना ऑर्डर दिल्याचा गंभीर आरोप जुंदालवर आहे.  


औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण - मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा


औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी अबु जुंदाल याला न्यायालयानं मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोबतच वीस हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने हा निर्णय दिला होता. तसेच इतर २ आरोपींना १४ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण २२ जणांना अटक झाली होती. त्यातील ११ आरोपी दोषी ठरले तर, १० जणांची सुटका झाली. लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी अबु जुंदाल मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या कटातील मुख्य सूत्रधार आहे.


मोदी - तोगडीयांना मारण्याचा कट 


८ मे २००६ रोजी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने कारचा पाठलाग करुन चांदवड-मनमाड महामार्गावर दोन गाडया पकडल्या होत्या. यावेळी तीन संशयितांना अटक करुन तीस किलो आरडीक्स, दहा एके-४७ आणि ३२०० बुलेट जप्त केल्या होत्या. त्यावेळी इंडिका गाडी जुंदाल चालवत होता. पोलिसांना चकवून तिथून निसटण्यात तो यशस्वी ठरला. तो मालेगावला गेला. काही दिवसांनी तो बांग्लादेशला पळून गेला तिथून तो पाकिस्तानात गेला. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यात त्याची महत्वाची भूमिका होती. २०१२ मध्ये सौदी अरेबियावरुन त्याला भारतात आणण्यात आले. २००२ मध्ये गुजरात दंगलीनंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगाडीया यांची हत्या करण्यासाठी हा कट रचला होता असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होतं.