मुंबई : एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी हे बुधवारपासून गूढरित्या बेपत्ता झालेत. बुधवारी कमला मिल इथल्या कार्यालयातून ते घरी जाण्यासाठी निघाले मात्र अद्याप ते घरी पोहचले नाहीत. गुरुवारी नवी मुंबईतून त्यांची कार सापडलीय. विशेष म्हणजे कारच्या सीटवर रक्ताचे डाग आढळलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी साडे आठच्या सुमारास कामावर जाण्यासाठी मलबार हिल इथून निघाले. मात्र रात्री दहापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून तिच्या पत्नीने बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी सिद्धार्थ हे सायंकाळी साडे सातच्या सुमारास कमला मिलमधून निघाल्याचे सांगितले. यानंतर त्यांच्या पत्नीने ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार केलीय. 


पोलिसांनी कमला मिलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी सिद्धार्थ हे बँकेतून बाहेर पडताना दिसत आहेत, मात्र त्यांची कार कमला मिलमधून बाहेर पडताना दिसत नाही. पोलिसांनी त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले त्यावेळी त्यांचे शेवटचे लोकेशन कमला मिल दाखवतंय. त्यांचा मोबाईलही बंद येतोय. 


याप्रकरणी तपास सुरु असताना त्यांची कार सापडलीय आणि त्यात सीटवर रक्ताचे डाग आढळल्याने संघवी यांचं काय झालं, त्यांची कार नवी मुंबईत कशी पोहचली याबाबत पोलीस तपास करत आहेत.